
Kolhapur News : राज्याचा हंगाम संपून महिन्याचा कालावधी झाला तरीही ‘एफआरपी’ची पूर्ण रक्कम देण्यात अजूनही साखर कारखाने गती घेत नसल्याची स्थिती आहे. पंधरा मे अखेरच्या आकडेवारीनुसार हंगाम सुरू केलेल्या २१० पैकी १०५ साखर कारखान्यांनीच ‘एफआरपी’ची रक्क्म ऊस उत्पादकांना अदा केली आहे.
सध्या साखरेला असणारी कमी मागणी व दरातही विशेष वाढ नसल्याने ‘एफआरपी’ थकबाकी असणारे बहुतांश कारखाने येणारा हंगाम सुरू होइपर्यंत ‘एफआरपी’ची रक्कम पूर्ण देऊ शकणार नाहीत असे चित्र आहे.
यंदा एप्रिलपासून साखरेला मागणी व दर वाढले. या काळात काही कारखान्यानी साखर विक्री केली त्या काळात साखरेचा उठाव होता. काही कारखान्यांनी या काळात आलेली रक्कम ऊस उत्पादकांना दिली.
३० एप्रिलअखेर १०९ कारखान्यांची ‘एफआरपी’ थकली होती. पंधरा मेअखेर यातील केवळ चार कारखान्यांनी एक रकमी एफआरपी दिली. हंगाम संपल्यापासून ‘एफआरपी’ची पूर्ण रक्कम देण्याचा कारखान्यांचा वेग एकदम मंद आहे. ८० ते ९९ टक्के रक्कम देणारे कारखाने ७९ आहेत. नजीकच्या काळात यातीलच काही कारखाने एफआरपीची पूर्ण रक्कम देऊ शकतील असा अंदाज आहे.
६० ते ७९ टक्क्यांपर्यंत १६ तर ५९ टक्क्यांपर्यंत १० साखर कारखाने आहेत. ‘एफआरपी’ची पूर्ण रक्कम देण्याची गती अशीच मंदावलेली राहिल्यास पुढील हंगामापर्यंत किमान ७० ते ८० कारखान्यांची थकबाकी कायम रहाण्याची शक्यता कायम आहे. यंदाच्या हंगामाच्या थकबाकीचे ओझे घेऊनच कारखान्यांना येणारा हंगाम सुरू करावा लागणार आहे.
‘एफआरपी’ची रक्कम देण्यात पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने आघाडीवर आहेत. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार ज्या भागात स्पर्धा आहे, त्या भागातील कारखाने ‘एफआरपी’ देण्यात आघाडीवर आहेत.
ज्या भागात स्पर्धा नाही तेथील कारखाने मात्र ‘एफआरपी’ देण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे.
सध्या कारखान्यांच्या पातळीवर शांतता आहे. साखर विक्री विभागातही फारशी लगबग नाही. यामुळे उस उत्पादकांना तातडीने रक्कम मिळणे अशक्य असल्याचे एका कारखाना प्रतिनिधीने सांगितले.
१५ मे अखेरची राज्यातील ‘एफआरपी’बाबतची स्थिती
हंगाम सुरू केलेले कारखाने ः २१०
देय एफआरपी ः ३३४७७ कोटी रुपये
दिलेली एफआरपी ः ३३३११ कोटी रुपये
थकित एफआरपी ः १६६ कोटी रुपये
पूर्ण एफआरपी न दिलेले कारखाने ः १०५
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.