Madhavrao More : माधवराव खंडेराव मोरे यांच्या भावूक आवाहनाने थरारली सभा

शेतकरी संप राज्य समन्वय समितीची बैठक जून 2017 मध्ये नाशिक येथे झाली होती. त्या बैठकीत माधवराव खंडेराव मोरे यांनी केलेल्या भाषणाचा हा वृत्तांत आहे. ॲग्रोवनमध्ये छापून आला होता. काल संध्याकाळी माधवराव खंडेराव मोरे यांचे निधन झाले. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा भाषणाचा वृत्तांत पुनर्प्रकाशित करत आहोत.
Madhavrao More
Madhavrao MoreAgrowon

शेतकरी संप राज्य समन्वय समितीची बैठक जून 2017 मध्ये नाशिक येथे झाली होती. त्या बैठकीत माधवराव खंडेराव मोरे यांनी केलेल्या भाषणाचा हा वृत्तांत आहे. ॲग्रोवनमध्ये (Agrowon) छापून आला होता. काल संध्याकाळी माधवराव खंडेराव मोरे (Madhavrao More) यांचे निधन झाले. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा भाषणाचा वृत्तांत पुनर्प्रकाशित करत आहोत.

"इथं घराला आग लागलीय..अन तुम्ही चाललात कुठं..परिस्थितीचा रेटा इतका वाढलाय. की तुम्हाला आता बदलावंच लागेल. तुमचं आता काहीही खरं नाही..शेतकरी आंदोलनाचा इतिहास जगलेले शरद जोशींचे एकेकाळचे पक्के सहकारी माधवराव खंडेराव मोरे यांनी नाशिकला झालेल्या शेतकरी संप राज्य समन्वय समितीच्या बैठकीतकापऱ्या आवाजात..व्याकूळ, होऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. तेव्हा सारी सभा थरारुन स्तब्ध वआवाक झाली होती..

ते म्हणाले "" तुम्ही पंधरा दिवस, महिनाभर संपाची तयारी केली. अन मग सगळे राजकीय पक्ष तुमच्या बाजूनं बोलायला लागले. कोणताही पक्ष तुमच्या विरोधात बोलत नव्हता. कारण त्यांना माहितीय. तुम्हाला गोंजारुन वेड्यात काढणं सोपंय. प्रत्येकानं तुमच्या नावानं ढोलकं पिटलं. त्यांनी तुम्हाला फसवलं नाही तर ते खातील तरी काय?

पक्ष, धर्म, जात हे सगळं बाजूला ठेवा. या नावानं होणाऱ्या बेरजा, वजाबाक्‍या बाजूला ठेवा. अन फक्त शेतकरी म्हणून एकत्र या. फक्त शेतीचा विषय डोक्‍यात घ्या.

लाईटली घेऊ नका. हा 40 वर्षांचा इतिहास आहे. जे जे शेतकरी संघटनेच्या सभेला येत होते. त्यांच्या वैचारिक पातळीत आमुलाग्र बदल होऊन ते घरी जात होते. घामाच्या दामासाठी तुमचे आजे पंजे लढत होते. तेव्हा तुमच्या पैकी कुणी आईच्या पोटात असाल. कुणी शाळेत जात असाल. जे जे लढले त्यांच्यापैकी आतापर्यंत 60 टक्के देवाघरी गेलेत. एवढं सगळं सोसून जेव्हा तुम्हीच चोरांच्या मागं जावून शेतकऱ्यांचीच वाट लावीत होते.

मागचे २५, ३० वर्षे मी हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहतोय. आमच्या शब्दावर हजारो शेतकऱ्यांनी लाठ्या काठ्या खाल्यात. हे राजु शेट्टी, रामचंद्र बापू यांना विचारा की कशा पद्धतीने गावागावातल्या म्हाताऱ्या बायाही जीवाची पर्वा न करताही लेकराबाळांसह रस्त्यावर उतरायच्या.

Madhavrao More
Wet Drought : ओला दुष्काळ जाहीर करा

आज तुझी

रस्त्यावर उतरायची तुम्ही भाषा करता आहात. तर पूर्ण नेटानं जोमाने उतरा एवढंच मला या प्रसंगी सांगायचंय..

मी तुमच्या हातात तराजू देतो. एका पारड्यात तुमचं आज शेतात उभं असलेलं पिक, अन दुसऱ्या पारड्यात तुमच्या डोक्‍यावर असलेलं सोसायटी, बॅंकेच कर्ज ठेवा. विचार करा. इतकी वर्ष कोणतं पारडं जड जातंय? तुमचं कर्ज कधीच का फिटत नाही? सगळं हातातून काढून घेतलं जात असतांना तुम्ही जागे होत नाहीय हे दुर्दैवं आहे. असंच जर चालू राहिलं तर जशा आतापर्यंत बाकीच्यांनी आत्महत्या केल्यात तसे तुम्हीही मरणार नाही हे कशावरून?. वेगळं काहीच होणार नाही.

आतापर्यंत सगळेच तुमच्याशी चोंबडेपणाने बोलत आलेत. माझं कटू बोलणं ऐकून घ्या. आपली ही शेवटची सभा असेल. तुम्हाला आता "चॉईस' राहीला नाही. कुणीही यावं अन तुमच्या पाठीवर थाप मारावी,, अन तुमचा कान कापून घेऊन जावं. असंच जर तुमचं बेहिशेबी वागण राहिलं तर तुम्हाला मरण्याशिवाय तुमच्याकडं दुसरा पर्याय उरणार नाही. हे नीट ध्यानात ठेवा.

मला मोठी घमेंड होती. जगात भारत एकदम भारी. भारतात महाराष्ट्र..महाराष्ट्रात नाशिक जिल्हा,, अन नाशिक जिल्ह्यात माझा निफाड तालुका. सगळी लोक मरतील पण निफाड तालुक्‍यातील माणसं कधीच आत्महत्या करुन मरणार नाहीत. ही घमेंड तुमच्याच भरवशावर होती. पण काय झालं.,, मागच्या तीस वर्षात निफाड तालुका आता सर्वाधिक आत्महत्याचा तालुका म्हणून ओळखला जायला लागलाय. याचं मुळ कारण म्हणजे तुम्ही बदलायला तयार नाही. तुमच्या तीन पिढ्यांचा मी अभ्यास केलाय. पोळून निघालोय मी.

आंदोलनात माझ्या जवळ लढणारे तीन सहकारी पोलिसांच्या गोळीबारात ठार झाले. मी डोक्‍यात एसआरपी चा मार खाला. रोज २४ औषधाच्या गोळ्या खाऊन जगतोय मी. मनातून कायम अस्वस्थ आहे. हा बी. जी. कोळसे पाटील माणूस तुमच्या साठी हाय कोर्टातली नोकरी सोडून रस्त्यावर उतरला. त्याला तुम्ही जोड्या जवळ उभे करीत नाही, अन तुम्ही चोरांच्या मागे धावता. आता सहन करणं अन धावणं बंद करा. आणखी किती वाट लावून घ्यायची राहिलीय.

तुमच्या पोरांची लग्नं सुध्दा होत नाहीत. पोरगी म्हणते एकवेळ मला विहिरीत ढकला. पण शेतकरी नवरा नको. तुमच्यावर ही वेळ कुणी आणलीय?. आता तर शेतकऱ्यांच्या पोरींनी सुध्दा आत्महत्या करायला सुरवात केलीय. काळ्या कुट्ट अंधारातून वाटचाल चालू आहे तुमची, मिणमिणता दिवाही दिसत नाहीय. पुन्हा एकदा सांगतो,जगायचं असेल तर ताठ मानेनं जगा. जात, धर्म, पक्ष बाजूला टाकून द्या. सहन करणं,अनं चमचेगिरी करणं सोडून द्या,. एकदातरी शेतकरी म्हणून एकत्र या

शब्दांकन : ज्ञानेश उगले

८ जुन २०१७

नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com