

ॲग्रोवन वृत्तसेवा
जत, जि. सांगली ः जत तालुका दुष्काळी जाहीर करा, विस्तारित म्हैसाळ योजनची संपूर्ण निविदा प्रक्रिया राबवून तातडीने काम सुरू करा, जनावरांसाठी चारा छावणी अथवा डेपो सुरू करा, म्हैसाळ आवर्तन सुरू करावे या मागण्यांसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय यांच्यासह इतर पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारी (ता. १७) जत शहरातील विजापूर गुहागर मार्गावरील महाराणा प्रताप चौकात ‘रास्ता रोको’ करण्यात आला.
माजी आमदार विलासराव जगताप व जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी सर्व पक्षांतील, संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनीही या आंदोलनास पाठिंबा दिला. जत येथील बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या आंदोलनास सुरुवात झाली. त्यानंतर आंदोलकांनी येथील महाराणा प्रताप चौकात येत ठिय्या मारत विजापूर गुहागर मार्ग रोखून धरला. यामुळे विजापूर, सांगोला, सातारा, अथनी मार्गांवरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जोवर सरकार सवलती देण्यासंदर्भात ठोस निर्णय घेणार नाही, तोवर आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला.
या वेळी आमदार विलासराव जगताप म्हणाले, की पाऊस नसल्याने खरीप हंगाम पूर्ण पणे वाया गेला असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शासनाने म्हैसाळचे आवर्तन सुरू करून जतच्या जनतेला पाणी द्यावे. शिवाय, दुष्काळ म्हणून जाहीर करू त्याचा लाभ शेतकऱ्यांना द्या. जतची जनता पाण्यासाठी टाहो फोडत असताना जिल्हाधिकारी बैठक घेत नाहीत. शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागते. यापेक्षा दुर्दैव काय, अशी खंतही व्यक्त केली. प्रकाशराव जमदाडे म्हणाले, की अनेक गावात टँकरची मागणी आहे. चाराटंचाई भासवत आहे. तालुक्याचे आमदार विधिमंडळात दुष्काळी भागाच्या ज्वलंत प्रश्नासाठी आवाज उठविण्याऐवजी जतमध्येच आंदोलन करतात, हे दुर्दैव आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.