
Nagar News : वादळी पाऊस व गारपिटीने शेतीपिकांचे, घरांचे मोठे नुकसान झाले. त्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी करून सात दिवसांत मदत देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र आता त्याला गुरुवारी (ता. ११) एक महिना लोटला. मात्र अजूनही कवडीचीही मदत मिळाली नाही. नुकसानीच्या पाहणीचा केवळ फार्स केला गेला, असा आरोप करत या भागातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
नगर जिल्ह्यासह राज्यातील विविध भागात गेल्या दीड महिन्यात जोरदार वादळ, पाऊस, गारपीट झाली. त्याचा मोठा फटका शेतीला बसला. नगर जिल्ह्यात सुमारे पंचवीस हजार हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले.
पारनेर तालुक्यातील वनकुटे, पळशी, खडकवाडी आदी भागांत ७, ८ एप्रिलला जोरदार गारपीट, वादळी पाऊस झाला. या पावसामुळे या भागातील कांदा, कलिंगड, उन्हाळी पीक, भाजीपाला, फळपीके आदींचे मोठे नुकसान झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ११ एप्रिल रोजी गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीची, घराच्या पडझडीची पाहणी केली. त्यावेळी सात दिवसांत मदत मिळेल.
ज्यांच्या घराचे नुकसान झाले त्यांना तातडीने निवारा मिळेल, असे आश्वासन दिले होते. मात्र आता एक महिना उलटला आहे. दोन घरे वगळता अन्य नुकसान झालेल्या कुटुंबाला मदत मदत मिळाली नाही. वनकुटे व परिसरासह जिल्हाभरात वादळी पाऊस, गारपिटीने मोठे नुकसान झाले आहे. सात दिवसांऐवजी एक महिना उलटला तरी अजूनही मदत मिळाली नाही.
ते शेतकरी त्रस्त... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर नेत्यांनी वनकुटे येथील बबन काळे यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी केली होती. काळे यांच्या कांदा व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले.
‘‘मी स्वतः शेतकरी आहे. म्हणून तर थेट बांधावर पाहणी करायला आलो आहे. घरात बसून निर्णय घेणारा मुख्यमंत्री नाही. सात दिवसांच्या आत मदत मिळेल.
ज्यांच्या घरांचे नुकसान झाले त्यांच्या घराची दुरुस्ती केली जाईल’’ असे सांगितले होते. मात्र पाहणी केलेल्या आणि खांद्यावर हात ठेवून मदतीचे आश्वासन दिलेल्या शेतकऱ्यांनाही मदत मिळाली नसल्याने ते शेतकरी त्रस्त आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.