
Pune News : ‘‘वीज ग्राहकांनी तत्पर बिल भरणा, ऑनलाइन पेमेंट व गो ग्रीनच्या सुविधेमुळे वीजबिलात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घ्यावा,’’ असे आवाहन ‘महावितरण’चे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.
वीज ग्राहकांनी मुदतीपूर्वी वीजबिलाचा भरणा केला तर त्यांना तत्पर बिल भरणा केल्याबद्दल एक टक्का सवलत मिळते. हे बिल ‘भीम अॅप’, ‘गुगल पे’, ‘पेटीएम’ किंवा बँकेच्या अॅपवरून किंवा ‘महावितरण’च्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने भरले तर पाव टक्का सवलत मिळते.
या खेरीज ग्राहकांनी छापील कागदी बिलाच्या ऐवजी ई-मेलने बिल स्वीकारण्याचा ‘गो ग्रीन’चा पर्यावरणपूरक पर्याय निवडला तर प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळते.
शंभर युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकाने तत्पर भरणा, ऑनलाइन पेमेंट आणि ‘गो ग्रीन’ या तिन्हीचा वापर केला तर दरमहा किमान २० रुपयांची म्हणजे वर्षाला २४० रुपयांची सूट मिळते.
२०० युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकाने या तीनही उपायांचा अवलंब केला तर दरमहा ३५ रुपये म्हणजे वर्षाला ४२० रुपयांची सवलत मिळते. महिना ३०० युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकाला दरमहा ५१ रुपयांची म्हणजेच वर्षाला ६१२ रुपयांची सवलत मिळू शकते, असे ‘महावितरण’कडून स्पष्ट करण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.