Sugarcane Cultivation : सांगलीत ६९ हजार हेक्टरवर ऊस लागवड
सांगली ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील आडसाली ऊस लागवडीचा (Sugarcane Cultivation) कालावधी संपला आहे. आडसालीची ४२ हजार ७८८ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.
सध्या पूर्व हंगामातील ऊस लागवड (Sugarcane Cultivation) सुरू आहे. पलूस तालुक्यातसह अन्य तालुक्यांतील काही भागांत आडसाली ऊस लागवडीऐवजी पूर्व हंगामातील ऊस लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा पूर्व हंगामातील क्षेत्रात (Sugarcane Acreage) वाढ होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात प्रामुख्याने आडसाली ऊस लागवड करण्यासाठी शेतकरी दरवर्षी पुढाकार घेतात; मात्र, गेल्या तीन वर्षांत जुलै-ऑगस्टमध्ये कृष्णा आणि वारणा नदीला महापूर आला होता.
त्यामुळे याचा फटका आडसाली लागवड केलेल्या उसाला बसला होता. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी ऊस लागवडीचे नियोजन बदलले असल्याचे चित्र आहे.
काही भागात मे महिन्यापासून आडसाली हंगामातील ऊस लागवड सुरू केली. तर काही ठिकाणी ऑगस्ट महिन्यात ऊस लागण केली.
जिल्ह्यात यंदा ६९ हजार ८१ हेक्टवर लागवड झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक लागवड वाळवा तालुक्यात झाली आहे. त्याखालोखाल पलूस तालुक्यात ९ हजार हेक्टरवर उसाचे क्षेत्र आहे.
वास्तविक पाहता, जिल्ह्यात आडसाली ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असतो; मात्र, महापुराचा फटका बसल्याने आडसाली उसाच्या क्षेत्रात घट होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
आडसाली उसाची लागवड ४२ हजार ७८८ हेक्टरवर आहे. खोडवा उसाचे ११ हजार ८९० हेक्टरवर आहे. सध्या पूर्व हंगामातील ऊस लागवड करण्याचे नियोजन शेतकरी करू लागला आहे. आतापर्यंत पूर्व हंगामात १४ हजार ३९६ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे.
आटपाडीत उसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता
आटपाडी तालुक्यात टेंभूचे पाणी आले आहे; मात्र, तालुक्यात दोन साखर कारखाने आहेत. त्यापैकी एक साखर कारखान्याने गेल्या दोन वर्षांपासून गाळप हंगाम सुरू केला नाही.
याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा तालुक्यात उसाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे.
तालुकानिहाय ऊस लागवड दृष्टीक्षेप (क्षेत्र हेक्टरमध्ये)
तालुका - क्षेत्र
मिरज - ८०१२
जत - ४९२४
खानापूर - २८३०
वाळवा - २४६५१
तासगाव - २७२५
शिराळा - ६३००
आटपाडी - ९६९
कवठे महांकाळ - ४२६०
पलूस - ९०९३
कडेगाव - ५३१८
एकूण - ६९०८१
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.