Sugar Production : यंदा उसाचे उत्पादन घटल्याने साखरेचे उत्पादन कमी होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान देशातील साखरेचा सध्याचा कोटा आणि भविष्यात तयार होणारी साखर याचा मेळ घातल्यास साखर कमी पडण्याची शक्यता आहे. यामुळे साखरेचे भाव वाढणार असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत होते. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून साखरेचे दर वाढत आहेत. मागच्या वर्षभरात साखरेने उच्चांक गाठला आहे.
साखरेचे दर वाढल्याची प्रतिक्रिया ग्राहकांमधून उमटण्याची शक्यता असल्यामुळे केंद्र सरकार सावध झाले आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन सरकार गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने शेतीमालाचे दर पाडण्यासाठी निर्णय घेत आहे. आता साखरेचे भाव पाडण्यासाठी साखरेवर साठे मर्यादा (स्टॉक लिमिट) लावण्याच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरू झाल्या आहेत.
मागील १५ दिवसांत साखरेचे दर ३ टक्क्यांनी वाढून ६ महिन्यांच्या उच्च्चांकावर गेले आहेत. मागच्या तीन महिन्यांपासून देशाच्या अनेक भागांत अजून पुरेसा पाऊस झाला नाही. यामुळे देशातील अनेक राज्यातील साखर पट्ट्यातील ऊस क्षेत्र घटले आहे.
पुढील साखर हंगामात साखरेच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेचे भाव झपाट्याने वाढत आहेत. यावर उपाय योजना न केल्यास ऐन सणासुदीत साखरेचे दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
मागच्या दोन दिवसांपूर्वी मंगळवारी (ता.०५) साखरेचे दर वाढून ३७.७६० रुपये (४५४.८० डॉलर) प्रतिटन झाले. ऑक्टोबर २०१७ नंतरचा हा उच्चांक आहे. भारतातील साखरेचे दर जागतिक पांढऱ्या साखरेच्या तुलनेत मात्र मात्र ३८ टक्के कमी असल्याची माहिती आहे. मागच्या गळीत हंगामापेक्षा यंदा साखरेचे उत्पादन ३.३ % घटण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
एका अहवालानुसार, ऑक्टोबरमध्ये सुरु होणाऱ्या नव्या गळीत हंगामात साखरेचे उत्पादन ३.३ टक्के घटून ३१.७ दशलक्ष टनांवर येऊ शकते.कारण देशातील एकूण साखर उत्पादनापैकी ५० टक्के साखर उत्पादित करणाऱ्या महाराष्ट्र आणि कर्नाटकात पुरेसा पाऊस पडलेला नाही.
साखरेच्या किंमतीत वाढ होण्याची भीती आहे. केंद्र सरकारने सध्या साखरेच्या निर्यातीवर बंद आणली आहे. किरकोळ बाजारात किंमती वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पण मुळात साठाच जास्त नसल्याने, उत्पादन घसरल्याने किरकोळ बाजारात साठेबाज प्रभाव पाडू शकतात. साखरेच्या किंमती भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.