
Mumbai News : राज्याचे आदिवासी विकासमंत्री विजय कुमार गावित यांची मुलगी सुप्रिया गावित यांना केंद्र सरकारच्या कृषी विभागाच्या योजनेतून १० कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला आहे. मंत्र्यांची मुलगी शासकीय योजनेची लाभार्थी कशी, असा सवालही त्यांनी केला आहे.
धुळे जिल्ह्यातील तुषार रंधे यांच्या मधुर फूड पार्क या संस्थेच्या २५ कोटी ८४ लाख रुपयांच्या फूड प्रोसेसिंग उद्योगाला १० कोटींचे अनुदान सरकारने मंजूर केले आहे. तुषार रंधे हे विजयकुमार गावित यांचे निकटवर्तीय असल्याचा दावाही सावंत यांनी केला. केंद्र सरकारच्या ‘किसान संपदा योजने’अंतर्गत केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने कृषी प्रक्रिया क्लस्टर प्रकल्पांना अनुदान दिले आहे.
या योजनेखाली देशभरातील ७० कृषी प्रक्रिया उद्योग कंपन्यांसाठी केंद्राने क्लस्टर मंजूर केला आहे. त्यात महाराष्ट्रातील १३ कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.
यात सुप्रिया गावित यांच्या ‘रेवा तापी व्हॅली इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट’ या कंपनीचा समावेश आहे. गावित यांच्या कंपनीने सादर केलेल्या २७ कोटी ६ लाख रुपये खर्चाच्या क्लस्टरला केंद्र सरकारने १० कोटींचे अनुदान मंजूर केले आहे, असे सावंत यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील परिवार वादाबद्दल जाहीरपणे टीका केली होती. या तीनही पक्षांतील नेते आपल्या मुलांसाठी राजकारण करतात, फायदा घेतात, असा आरोप त्यांनी जाहीर सभेतून केला होता. मात्र भाजपच्या मंत्र्यांच्या मुलीला मिळालेल्या लाभाचे काय, असा सवाल सावंत यांनी केला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.