पालघरमध्ये पर्ससीनविरोधात संघर्ष पेटणार

एलईडी दिव्यांचाही सुळसुळाट; पारंपरिक मच्छीमार हवालदिल
Fishing
FishingAgrowon

भाईंदर : उत्तन ते पालघरपर्यंतच्या सागरी पट्ट्यात पर्ससीन जाळ्या व एलईडी दिवे असलेल्या मासेमारी(Fishing) नौकांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाला आहे. या पट्ट्यात या मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी असतानाही झुंडशाहीच्या जोरावर या नौका बेकायदेशीरपणे मासेमारी करत आहेत.

परिणामी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारा स्थानिक मच्छीमार हवालदिल झाला असून शासकीय यंत्रणांनी या मासेमारी नौकांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा करत आहे. शासकीय यंत्रणांनी कारवाई केली नाही तर स्थानिक मच्छीमार एकत्र येऊन पर्ससीन मासेमारी नौकांचा स्वत:च प्रतिबंध करतील, अशा मनस्थितीत आता मच्छीमार असल्यामुळे समुद्रात संघर्ष उभा राहाण्याची भीती व्यक्त होत आहे.

पर्ससीन मासेमारीचा पारंपरिक मासेमारी व पर्यावरणावर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने समिती गठित केली होती. या समितीने केलेल्या शिफारशीनुसार पालघर जिल्ह्यातील झाई ते रायगड जिल्ह्यातील मुरूडपर्यंतच्या किनाऱ्‍यापासून बारा सागरी मैलापर्यंतचे क्षेत्र पारंपरिक मासेमारीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

या क्षेत्रात पर्ससीन जाळ्यांद्वारे मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आहे. २०१६ मध्ये राज्य शासनाने तसेच आदेश जारी केले आहेत. असे असतानाही गेल्या काही दिवसांपासून उत्तनसह वसई, पालघर, डहाणूपर्यंतच्या सागरी क्षेत्रात पर्ससीन जाळ्या व एलईडी दिवे असलेल्या मासेमारी नौका बेधडकपणे मासेमारी करत आहेत.

या मासेमारी नौका एक किंवा दोन नसून दोनशेच्या आसपास मासेमारी नौका झुंडीने मासेमारीसाठी येत आहेत. झुंडशाहीच्या जोरावर स्थानिक मच्छीमारांना दमदाटी करून पर्ससीन नौका जबरदस्तीने मासेमारी करत आहेत. पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्‍या नौका एकत्र नसतात. त्या समुद्रात ठिकठिकाणी विखुरलेल्या असतात, त्यामुळे मच्छीमार पर्ससीन नौकांचा प्रतिकार करू शकत नाहीत. पण आता या भर समुद्रात पर्ससीन विरुद्ध पारंपरिक मच्छीमारांमध्ये संघर्ष उभा राहणार आहे.

Fishing
Crop damage : देवळ्यात ३० क्विंटल मका कणसे खाक

नवे संकट उभे

काही दिवसांपूर्वी पर्ससीन मासेमारी करणाऱ्‍या नौकेला तब्बल दोन कोटी रुपये किमतीचे घोळ मासे मिळाले असल्याचेही मच्छीमारांनी सांगितले. आधीच समुद्रात आलेली वादळे, मासळीचा दुष्काळ याचा सामना करत असलेल्या पारंपरिक मच्छीमारापुढे आता पर्ससीन मासेमारी नौकांचे संकट उभे ठाकले आहे. बंदी असतानाही मासेमारी करणाऱ्‍या पर्ससीन नौकांवर शासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे मच्छीमारांमध्ये तीव्र नाराजी आहे.

पर्ससीन मासेमारी नौकांविरोधात मत्स्य व्यवसाय विभागाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. पण कारवाई करण्यासाठी यंत्रणाच नसल्याचे या विभागाकडून सांगण्यात येते. पर्ससीन नौका झुंडीने येत असून त्यांची समुद्रात मोठी दादागिरी सुरू आहे.

त्यामुळे स्थानिक मच्छीमार या पर्ससीन नौकांना त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याच्या मनःस्थितीत आहेत. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणांनी एकत्रित येऊन पर्ससीन नौकांवर कडक कारवाई करावी, अन्यथा समुद्रात मोठा संघर्ष होईल.

- बर्नड डिमेलो, कार्याध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती

पिलेही जाळ्यात

पर्ससीन नौकांवर महाकाय जाळ्या बसवलेल्या असतात. या जाळ्या यांत्रिक पद्धतीने समुद्राचा तळ अक्षरश: खरवडून काढतात. त्यामुळे त्यात मोठ्या मासळीसह मासळीची पिले देखील पकडली जातात. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्‍यांच्या हाती काहीच लागत नाही, असे येथील मच्छीमारांचे म्हणणे आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com