
Agriculture Electricity News सातारा : देशातील उद्योगपतींची अब्जावधी रुपयांची वीजबिलांची थकबाकी (Electricity Arrears) असताना त्यांना महावितरण (Mahavitaran) अभय देत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या व देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांची वीज कनेक्शन (Power Cut) तोडण्याचा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सपाटा लावला आहे.
अधिकाऱ्यांनी हा मुजोरपणा तत्काळ थांबवावा. अन्यथा, रयत क्रांती संघटना त्यांना हिसका दाखवेल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे यांनी पत्रकाद्वारे दिला.
या संदर्भात श्री. साबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की सध्या सातारा जिल्ह्यात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेती पंपांचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे.
शेतकऱ्यांचे व गोरगरिबांची वीजबिलाची एक महिन्याची थकबाकी राहिली तरी वीज कनेक्शन तोडले जात आहे. वास्तविक, वीज कनेक्शन घेताना अनामत रक्कम भरण्यात आलेली असते.
असे असताना अशाप्रकारे तालिबानी पद्धतीने एक महिन्याची थकबाकी राहिली तरी वीजतोडणी करण्यात येत आहे. ही बाब अन्यायकारक असून, हा अन्याय रयत क्रांती संघटना सहन करणार नाही.
एका बाजूला ऊस कारखानदार वर्ष झाले तरी शेतकऱ्यांची पैसे देण्यास तयार नाहीत. त्यामध्ये सरकार व जिल्हाधिकारी कुठेही हस्तक्षेप करण्यास तयार नाहीत. दुसऱ्या बाजूला सरकारचाच भाग असलेल्या महावितरण शेतकऱ्यांची वीज तोडत आहे.
येत्या काळात शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनला कोणत्याही वीज कर्मचाऱ्यांनी हात लावण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा परिणाम थेट महावितरणच्या अधीक्षक अभियंता व ऊर्जामंत्री यांना सहन करावा लागतील, असा इशारा साबळे यांनी दिला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.