
कोल्हापूर : आम्ही नुकतेच वजन काट्याबाबत पुण्यात आंदोलन केले. आयुक्तालयाने बाहेर वजन केलेला ऊस कारखान्यांना (Sugarcane Factory) घेण्याची सक्ती केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. प्रणालीमध्ये अजूनही काही त्रुटी आहेत त्या दूर करण्याचे आवाहन आम्ही आयुक्तालयाला केले आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी शुक्रवारी (ता. ११) पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी सावकार मादनाईक, जालिंदर पाटील आदी उपस्थित होते. श्री. शेट्टी म्हणाले, की दोन टप्प्यांतील एफआरपी (रास्त आणि किफायतशीर दर)ऐवजी एकरकमी एफआरपीचा कायदा हिवाळी अधिवेशनात संमत करावा. एफआरपीचे सूत्र बदलून एफआरपीत वाढ करावी, या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यात १७ व १८ नोव्हेंबरला सलग दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलन करण्यात येणार आहे.
साखरेची किमान विक्री किंमत ३१०० वरून ३५०० रुपये करावी, सर्व प्रकारच्या इथेनॉलमध्ये प्रतिलिटर पाच रुपयांची वाढ करावी, इथेनॉल विक्रीमध्ये शेतकऱ्याला ७० टक्के हिस्सा मिळावा, खुल्या साखर निर्यात धोरणांतर्गत साखर निर्यातीला परवानगी द्यावी, आदी प्रमुख मागण्यांकडे केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
सर्व वजन काटे संगणकीकृत करावेत, काटा मारीत राज्य सरकारने ठोस भूमिका घ्यावी. आदी मागण्याही आम्ही या आंदोलनाच्या निमित्ताने राज्य सरकारकडे करणार आहोत. या दोन दिवशी शेतकऱ्यांनी तोडी घेऊ नयेत. कारखानदारांनी तोडणी बंद ठेवावी. आंदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्यांबरोबर साखर उद्योगाच्या हितासाठी सरकारला इशारा द्यावा, असे आवाहन श्री. शेट्टी यांनी या वेळी केले
श्री. शेट्टी म्हणाले, की गेल्या हंगामात गाळप झालेल्या उसासाठी एफआरपीसह दोनशे रुपये ज्यादा देण्यासाठी आम्ही कारखान्यांचे ऑडिट करण्यासाठी आयुक्तालयाला सांगितले होते. आयुक्तालयाने ही कारखान्यांना याबाबत कल्पना दिली.
अनेक कारखान्यांनी हा हिशोब सादर केला नाही. ज्या कारखान्यांनी हा हिशेब सादर केला ते कारखाने शॉर्ट मार्जिन मधून बाहेर पडल्याचे दिसत आहे. हा हिशेब तपासणारी ऊस समिती अद्याप कार्यान्वित नाही. यामुळे गेल्या हंगामातील दोनशे रुपये रखडले आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.