
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामात (Kharif Season) अतिवृष्टी व सततचा पाऊस यामुळे सोयाबीन (Soybean), मूग व उडीद या पिकांची मोठी (Crop Damage) हानी झाली. याचा एकूणच परिणाम उत्पादन सरासरीवर झाला आहे. सोयाबीनची उत्पादकता (Soybean Productivity) ६३९ किलो प्रति हेक्टरी, अर्थात २.५५ क्विंटल प्रतिएकर आली आहे. मुगाची २६ किलो व उडदाची २८ किलो हेक्टरी सरासरी आली आहे.
जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याची पैसेवारी ४६ पैसे काढली आहे. ही पैसेवारी दुष्काळग्रस्त जिल्ह्याच्या श्रेणीतील आहे. उत्पादनाची सरासरी व जाहीर झालेली पैसेवारी बघता शासनाकडून आता दुष्काळाची अधिकृत घोषणा बाकी आहे.
या वर्षी खरीप हंगामात ६ लाख ८१ हजार ७०९ हेक्टर सरासरी पेरणी क्षेत्राच्या तुलनेत ६७४३९६ हेक्टरमध्ये (९९ टक्के) पेरणी झाली होती. यामध्ये सोयाबीनची पेरणी २ लाख ५२ हजार ११६ हेक्टर, तर मूग ७७३९ व उडीद १९०६ हेक्टरमध्ये होता.
खरीप हंगामात ९१५ मिमीच्या तुलनेत ९३९ मिमी पाऊस म्हणजे सरासरीच्या १०८ टक्के पाऊस झाला. तर ऑक्टोबरमध्ये ८३ मिमी पाऊस झाला.
अतिवृष्टी व संततधार पावसामुळे खरिपातील मूग, उडीद आणि सोयाबीनला सर्वाधिक फटका बसला. १ लाख ६८ हजार ७०८ हेक्टरमधील सोयाबीन उद्धस्त झाले. तर ७५५१ हेक्टरमधील मूग व १४५३ हेक्टरमधील उडीद नष्ट झाला.
कृषी विभागाने पीक कापणी प्रयोगानंतर काढलेली उत्पादकता अतिशय कमी आली आहे. सोयाबीनची उत्पादकता हेक्टरी ६३९.१४ किलो, तर मुगाची २२.५९ व उडदाची ३१.५२ किलो आली आहे.
त्यामुळे मूग व उडदाचा पेरणी, तसेच मशागतीचा खर्चही निघणे कठीण आहे. सोयाबीनच्या उत्पादकतेतूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.
कापूस व तुरीच्या उत्पादनाची सरासरी अद्याप काढायची असून, रब्बी हंगामातील हरभरा आणि गव्हापासून शेतकऱ्यांनी अपेक्षा ठेवली आहे.
खरीप हंगामातील अतिवृष्टी व सततचा पाऊस याचा परिणाम सोयाबीन, मूग व उडीद या पिकांवर झाला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पिके मोडली. प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम उत्पादनावर झाला असून, सरासरी घसरली आहे.
-अनिल खर्चान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.