जळगाव ः खानदेशात बाजरीची पेरणी (Pearl Millet Sowing) रखडली आहे. मागील काही दिवसांपासून थंडी व ढगाळ वातावरण (Cloudy Weather) असल्याने शेतकऱ्यांनी पेरणी (Sowing) टाळली आहे. डिसेंबरअखेर खानदेशात पेरणी सुरू होती. यंदा थंडी कमी होती. डिसेंबरमध्ये सुमारे १७ दिवस ढगाळ वातावरण होते.
यामुळे अनेक शेतकऱ्यांनी डिसेंबरअखेर पेरणीचे नियोजन केले. परंतु डिसेंबरच्या अखेरीस थंडी वाढली. कमाल तापमान २९ व किमान तापमान धुळ्यात सात अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. तर जळगावातही किमान तापमान आठ ते नऊ अंश सेल्सिअसखाली आले. या महिन्यातही थंडी कायम आहे.
बुधवारी (ता.४) ढगाळ व थंड वातावरण दिवसभर होते. सकाळपासून थंड वारे होते. यामुळे शेतकऱ्यांनी बाजरीची पेरणी टाळली आहे. पेरणी रखडल्याची स्थिती असून, कोरड्या वातावरणाची प्रतीक्षा आहे.
किमान तापमान १२ ते १३ अंश सेल्सिअसवर पोचण्याची आवश्यकता असल्याचे शेतकरी सांगत आहेत. खानदेशात बाजरीची पेरणी यंदा वाढेल, असे सांगितले जात आहे. त्यासंबंधी शेतकरी बियाण्याचे नियोजनही करीत आहेत.
अनेक कंपन्यांनी आपले बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. सुमारे सात ते साडेसात हजार हेक्टरवर बाजरीची पेरणी होईल, अशी अपेक्षा आहे.
धुळ्यातील शिंदखेडा व शिरपूर तालुक्यात बाजरीचे क्षेत्र अधिक असते. तसेच जळगावमधील भडगाव, चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, बोदवड, चोपडा, धरणगाव, जळगाव या भागातही बाजरी पीक असते.
रावेर, जामनेर, यावल, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागात बेवडसाठी बाजरीची पेरणी केली जाते. कमी कालावधी, कमी पाणी व कमी खर्चात चांगला चारा, उत्पादन देणारे पीक म्हणून बाजरीला खानदेशात शेतकरी पसंती देतात. पेरणी जानेवारीच्या सुरुवातीला सुरू होते. परंतु यंदा पेरणी आठवडाभर लांबेल, असे दिसत आहे.
चांगल्या दराची अपेक्षा
बाजरीचे एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन अनेक शेतकरी खानदेशात साध्य करतात. जळगाव, चोपडा, रावेर भागांत ठिबकच्या मदतीने बाजरीचे सिंचन अनेक शेतकरी करतात. यातून उत्पादन अधिकाधिक साध्य करता येते. दरही टिकून आहेत. मागील हंगामात प्रतिक्विंटल २१०० रुपयांपर्यंतचे दर बाजरीस मिळाले होते. यंदाही दर चांगले मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.