Kharif Sowing : राज्यातील पेरण्या अंतिम टप्प्यात

Kharif Season : एकूण पेरा ८९ टक्क्यांवर
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Sowing : पुणे ः राज्यातील खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. आतापर्यंत ८९ टक्क्यांच्या पुढे पेरा गेला आहे. सोयाबीनचा पेरा पूर्ण झालेला आहे. तसेच कापूस व तुरीच्या पेरण्या शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत.

कृषी आयुक्तालयाच्या सांख्यिकी विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात खरिपाचा सरासरी पेरा १४२ लाख हेक्टरवर होतो. एक ऑगस्टअखेर खरिपाच्या पेरण्या गेल्या हंगामातील तुलनेत ९४ टक्क्यांपर्यंत झालेल्या आहेत. एकूण पेरा आता १२६ लाख हेक्टरवर गेला असून सरासरी क्षेत्राच्या ८९ टक्क्यांपर्यंत पेरण्या पोहचल्या आहेत. राज्याच्या बहुतेक भागात गेल्या आठवडाभरात हलका व मध्यम पाऊस झाला. तसेच पुण्यासह अमरावती व नागपूर विभागांत काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरण्या वेगाने पुढे सरकत आहेत.

तुरीचा पेरादेखील १०.२१ लाख हेक्टरचे क्षेत्र ओलांडून पुढे गेला आहे. राज्यात तुरीखालील सरासरी क्षेत्र १३ लाख हेक्टरच्या आसपास आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ९१ टक्के पेरा झालेला होता. त्यामुळे तुरीचा पेरा यंदा किंचित पिछाडीवर असल्याचे दिसून येते. दुसऱ्या बाजूला दमदार पावसामुळे राज्याच्या भात उत्पादक पट्ट्यात भात पुनर्लागवडीला वेग आला आहे. राज्यात सरासरी १५ लाख हेक्टरवर भात पिकवला जातो. गेल्या वर्षी याच कालावधीत भात लागवड ११ लाख हेक्टरच्या पुढे होती. यंदा ती सध्या साडेनऊ लाख हेक्टरच्या आसपास म्हणजेच ६२ टक्के दिसते आहे. चालू आठवड्यात पावसाची उघडीप पाहून भात उत्पादक पट्ट्यातील पुनर्लागवडीची कामे बऱ्यापैकी पुढे सरकतील, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात खरिपाची पेरणी अंतिम टप्प्यात

सरासरी ११३ टक्क्यांवर सोयाबीन
कापूस व सोयाबीन ही राज्याची मुख्य खरीप पिके आहेत. त्यात सोयाबीनचा पेरा यंदा ४६ लाख ७२ हजार हेक्टरच्या पुढे गेला आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ४१.५० लाख हेक्टर असताना पेरा मात्र ११३ टक्के झालेला आहे. कपाशीच्या ४२ लाख हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी आतापर्यंत ४०.८४ लाख हेक्टरवर म्हणजेच ९७ टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. गेल्या हंगामात याच कालावधीत कपाशीचा पेरा ९८ टक्के होता. त्यामुळे कपाशीची वाटचाल यंदा गेल्या हंगामासारखीच चालू असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.

खरीप पेरण्यांची अंदाजे स्थिती (३१ जुलैअखेर)
पीक-सरासरी क्षेत्र-गेल्या वर्षीचा पेरा-चालू वर्षांचा पेरा (टक्के)
धान १५०८३७४----११०६९८५------९३२७५५(८४)
ज्वारी २८८६१५----१४४१२१-------९८६०० (६८)
बाजरी ६६९०८९----३८७८१६--------२५६२८४ (६६)
नाचणी ७८१४९---४४७२०----------३७१४० (८३)
मका ८८५६०८----८३३२६०---------७४०००० (८९)
तूर १२९५५१६---११२१४०८---------१०२१०५८ (९१)
मूग ३९३९५७----२६७५३३----------१५०४९४ (८९)
उडीद ३७०२५२---३४३७५५--------१९६४२६ (५७)
भुईमूग १९१५७५----१४८९३०-------११३७३३ (७६)
तीळ १५१६२--------५९४५---------३८३३ (६४)
कारळे १२४६०------४०२७----------३७७४(९४)
सूर्यफूल १३७८०-----१३८९७----------९५३(७)
सोयबीन ४१४९९१२--४७१०१९०------४६७२५८६(९९)
कापूस ४२०११२८----४१६४६५१------४०६४३३०(९८)
- सर्व आकडे अंदाजे व हेक्टरमध्ये आहेत.
- कंसातील आकडे गेल्या हंगामातील पेरण्यांच्या तुलनेत यंदा आतापर्यंत झालेल्या पेरणीची टक्केवारी दर्शवितात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com