Snehvan : आत्महत्याग्रस्त कुटुंबातील १०० मुलांना ‘स्नेहवन’ देणार आसरा

Help For Farmers Children: शेतकरीपुत्रांना पहिली ते बारावीपर्यंत निवासी शिक्षणाची सुविधा
Snehvan
Snehvan
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : राज्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांमधील १०० मुलामुलींना मोफत निवासासह शिक्षण देण्याचा निर्धार आळंदी येथील ‘स्नेहवन’ या सामाजिक संस्थेने घेतला आहे.


आत्महत्याग्रस्त व गरीब शेतकऱ्यांना निवारा देणारे ‘स्नेहवन’ (Snehvan) म्हणजे मराठवाड्यातील शेतकरी अशोक बाबाराव देशमाने (मंगरुळ, ता. मानवत, जि. परभणी) (Ashok Deshmane) या उच्चशिक्षित तरुणाने कष्टातून साकारलेला एक सर्वोत्तम प्रकल्प समजला जातो.

स्वतः श्री. देशमाने शेतीत राबून आयटी इंजिनिअर बनले. मात्र, त्यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून दिली आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेणं पसंत केले. त्यासाठीच ‘स्नेहवन’ सुरू केले.

विशेष म्हणजे श्री. देशमाने यांची पत्नी सौ. अर्चना यांनीही या कार्याला सारे आयुष्य समर्पित केले आहे. अशोक व अर्चना यांनी आत्महत्याग्रस्त निराधार मुलांचे आईवडील होणे पसंत केले आहे.

Snehvan
अकोला झेडपी देणार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी मदत

आळंदी मार्गावर भोसरीच्या चक्रपाणी वसाहतीमध्ये ११ मुलांना आसरा देत चक्क पत्रांच्या खोलीत आठ वर्षांपूर्वी देशमाने दांपत्याने स्नेहवन सुरू केले होते. त्यांची जिद्द पाहून पुण्यातील डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी स्वमालकीची दोन एकर जागा स्नेहवनला दान केली.

राज्यातील दानशुरांच्या मदतीमुळे आळंदी वडगाव मार्गावरील कोयाळी फाट्यावर आता स्नेहवन नव्या स्वरूपात उभारले गेले आहे.

Snehvan
Junnar Tourism : जुन्नरच्या पर्यटन विकासासाठी १०० कोटींचा निधी देणार

तेथे १०५०० फुटांची इमारत उभारण्यात आली असून शेतकरीपुत्रांना पहिली ते बारावीपर्यंत मोफत निवासी शिक्षणाची सुविधा मिळणार आहे.


श्री. देशमाने म्हणाले की, आम्ही या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील १०० आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या संपूर्ण संगोपनाची जबाबदारी घेत आहोत.

त्यासाठी निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. ४५०० चौरस फुटाची आणखी एक इमारत तयार होत असून पुढील वर्षी तेथे ५० मुलींचे स्वतंत्र वसतिगृह उभे राहील. त्यामुळे एकूण १५० मुलांची काळजी स्नेहवन घेईल.

शिक्षणाची हेळसांड होणाऱ्या गरीब व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील लेकरांनी गुराढोरांमागे न जाता किंवा मजुरी न करता चांगले शिक्षण घेत आदर्श नागरिक बनावे, हा एकमेव उद्देश आमचा आहे.

स्नेहवनमध्ये केवळ निवास व शिक्षण मोफत दिले जात नसून मुलांना संगणक, योग, संगीत, मल्लखांब विद्या शिकवली जाते. मुलांसाठी येथे १५ हजार पुस्तकांचे ग्रंथालय, गीर गाईचे दूध आणि व्यायामशाळा अशा सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीआधारित कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण देण्याची सुविधादेखील स्नेहवनमध्ये आहे. मुलांना गोठ्यात दूध काढण्यापासून ते पनीर, खवा बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. तेलघाणा, डाळ निर्मिती, मसाले, पापड तयार करणेदेखील शिकवले जाते.


स्नेहवनचा उद्देश बारावीपर्यंत मुलांना गुणवत्तापूर्ण निवासी शिक्षण देण्याचा असला तरी कष्टाळू व हुशार मुलांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देण्याची किमया देशमाने दांपत्याने साधली आहे.

त्यामुळेच स्नेहवनमधील काही मुले आता बीसीए, बीकॉम, एमएस्सीपर्यंत शिक्षण घेत आहेत. माझ्या या कार्यातून एक आत्महत्या थांबली तरी आमचा उद्देश सफल झाला, असे मानतो, असे देशमाने म्हणाले.


मी स्वतः शेतकरी आहे. मी कष्ट करीत शिकलो; पण मी सुखात जगण्यासाठी शहरात आलो नसून समाजाचे काही तरी देणे लागतो या विचाराने प्रेरित झालो. त्यामुळेच मी नोकरी, घरदार सोडून आळंदीला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ही संस्था उभारली. तेथे उत्तम शिक्षणासह आदर्श संगोपन केले जाते. आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांच्या बुद्धी, मन आणि शरीराचा सर्वांगिण विकास व्हावा हे माझे ध्येय आहे. राज्यातील गरजू शेतकरी कुटुंबांनी त्यांची मुले स्नेहवनमध्ये पाठवावीत.
- अशोक देशमाने, संस्थापक, स्नेहवन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com