
Pune News : ‘‘पारदर्शकता, प्रयोगशीलता आणि बदलीची सतत तयारी अशी त्रिसूत्री सरकारी सेवेत ठेवल्यास प्रशासनातील अधिकाऱ्यांना सेवा करताना कुणालाही घाबरण्याची गरज नाही. मी हेच धोरण ठेवल्यामुळे लोकोपयोगी सेवा करू शकलो,’’ अशा शब्दांत राज्याचे मावळते साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आपल्या यशाचे गमक सांगितले.
श्री. गायकवाड तसेच साखर संचालक उत्तम इंदलकर तसेच सहायक संचालिका साधना हाडके हे तीन वरिष्ठ अधिकारी बुधवारी (ता.३१) साखर आयुक्तालयाच्या सेवेतून निवृत्त झाले. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यगौरव सोहळ्यात ते बोलत होते. सहकार खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, वंदना गायकवाड, अर्चना इंदलकर उपस्थित होत्या.
श्री. गायकवाड म्हणाले,“मी ३७ वर्षे सेवा केली; पण पहिल्या दिवसाइतकाच आजही उत्साही आहे. कारण, सरकारी सेवेला मी सामाजिक सेवा मानले. मी माणूस वाचत गेलो. सतत बदलीची आणि बदलाची तयारी ठेवली.
मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून मला दोनदा सेवा करण्याची संधी मिळाली. परंतु, मंत्रालयात धावपळ फार असते. तेथे सामान्य माणूस किंवा त्याच्या दैनंदिन जीवनाशी सरकारी अधिकारी म्हणून कमी संबंध येतो.
तुम्हाला चांगले बदल करायचे असल्यास वरच्या स्तरावर नव्हे तर तळाला क्षेत्रिय पातळीवर काम करावे लागते. मी अनुभवाला गुरू मानले. शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी मी काय करू शकतो, ही भावना सतत बाळगली. त्यामुळेच समाधानकारक सेवा करता आली.”
अनुप कुमार म्हणाले, ‘‘महसूल क्षेत्राची बाराखडी आम्ही गायकवाड यांच्याकडून शिकलो आहोत. माझ्या सहकार मंत्रालयाच्या कक्षेतील विविध विभागांपैकी सर्वात भक्कम विभाग साखर आयुक्तालय होता.
कारण, येथे गायकवाड यांच्यासारखा आयुक्त लोकांना केंद्रस्थानी ठेवत कार्यरत होता. आज जगात साखर उत्पादनात पहिल्या क्रमांकावर राज्याला नेण्यास गायकवाड यांचे कष्ट, प्रयोगशीलता, सचोटी कारणीभूत आहे. मंत्रिमंडळानेही त्यांचे कौतुक केले होते.’’
श्री. कवडे म्हणाले, ‘‘सरकारी नोकरी किती वर्षे केली; यापेक्षा नोकरी कशी केली, जनतेला कशी सेवा दिली याला महत्त्व असते. श्री .गायकवाड यांनी सर्वत्र उत्तम सेवा दिली आहे. त्यामागे त्यांचा अभ्यास, कष्ट, सचोटी आणि प्रामाणिकपणा हे गुण आहेत. सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचे गुण घेतले पाहिजे.’’
या वेळी श्री. इंदलकर यांचा एक इमानदार आणि कठोर अधिकारी म्हणून सर्व वक्त्यांनी गौरव केला. साखर सहसंचालक संतोष पाटील व राजेश सुरवसे, मंगेश तिटकारे, शरद जरे, सहकार सहनिबंधक डॉ. संजयकुमार भोसले, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे यांनी मनोगत व्यक्त केले. राज्याच्या साखर, सहकार व महसूल विभागातील उच्चपदस्थ अधिकारी या वेळी उपस्थित होते.
साखर आयुक्तालयात दिवाळी
शेखर गायकवाड व उत्तम इंदलकर यांच्या निवृत्ती सोहळ्यानिमित्त साखर आयुक्तालय बुधवारी दिवाळीसारखे सजले होते. सर्वत्र रांगोळी व फुलांची सजावट करण्यात आली होती. ‘श्री. गायकवाड यांनी शेतकरी वर्गाला आंदोलनाची वेळ येऊ दिली नाही.
त्यांनी तत्पर, स्वच्छ आणि सौजन्यशील पद्धतीने प्रशासन केले. सर्वाधिक पुस्तके लिहिणारा लोकप्रिय सनदी अधिकारी तसेच शिपायापासून सचिवांपर्यंत सर्वांशी माणुसकीने वागणारा दिलदार अधिकारी,’ अशा शब्दांत आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचा गौरव केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.