Pune News : ‘‘शेतात कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधेमुळे होणारे मृत्यू टाळलेच पाहिजेत. त्यासाठी कीटकनाशके उद्योगातील संस्थांनी सुरक्षा साधनांचे वाटप करावे,’’ अशा सूचना राज्याचे कृषी संचालक (निविष्ठा व गुण नियंत्रण) विकास पाटील यांनी दिल्या आहेत.
कीटकनाशकांच्या अयोग्य वापरामुळे राज्यात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी कृषी आयुक्तालयात शनिवारी (ता.१३) आयोजित केलेल्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरून श्री. पाटील बोलत होते.
यावेळी समितीचे सदस्य सचिव व राज्याचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक डॉ. टी. ई. नरुटे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. पी. एस. नेहरकर, डॉ. विनायक जळगावकर, डॉ. कीर्ती पवार तसेच राज्य आरोग्य विभाग, क्रॉप केयर फेडरेशन ऑफ इंडिया, क्रॉप लाईफ इंडिया, पेस्टिसाईड्स मॅन्युफॅक्चरर्स अँड फॉर्म्युलेटर्रस् असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
‘‘कृषी विभाग, आरोग्य विभाग, कीटकनाशके निर्मिती उद्योग यांनी एकत्रितपणे काम केल्यामुळे राज्यात कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येवर नियंत्रण आणण्यात यश आले आहे,’’ असे कृषी संचालकांनी बैठकीत स्पष्ट केले.
कीटकनाशकांमुळे होणारी विषबाधा टाळण्यासाठी कृषी विभागाकडून होत असलेल्या उपक्रमांचे कीटकनाशक उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी स्वागत केले.
खरिपातील कापूस व सोयाबीन या पिकांवर अति तीव्र स्वरूपाच्या कीटकनाशकांची मोठ्या प्रमाणात फवारणी होते. त्यामुळे या दोन पिकांची फवारणी नियोजनबद्ध होण्यासाठी जनजागृती कार्यक्रम हाती घेण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.
प्रत्येक जिल्ह्यात एक कंपनी समन्वयक
भविष्यात विषबाधेचे प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक कीटकनाशक उत्पादक कंपनी समन्वयक म्हणून काम करणार आहे. मात्र, कीटकनाशकांद्वारे होणाऱ्या विषबाधांबाबत राज्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला अत्यावश्यक माहिती द्यावी लागेल. त्यामुळे या घटनांबाबत वेळेत व योग्य उपचार होतील, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.