

Jalna News : या वर्षी जिल्ह्यात लांबणीवर पडलेला पाऊस व रखडलेल्या पेरण्या या पार्श्वभूमीवर खरपुडी येथील शास्त्रज्ञांनी पुढाकार घेऊन ४ जुलै रोजी एकाच दिवशी कार्यक्षेत्रातील जालना, मंठा, परतूर आणि घनसावंगी या चार तालुक्यातील गावांना भेटी देऊन पाऊस आणि पेरणी स्थितीचा घेतला आढावा घेतला. तसेच शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन केले.
या भेटीत कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने यांचासह पीक संरक्षण तज्ञ अजय मिटकरी, मृद्शास्त्रज्ञ राहुल चौधरी, उद्यानविद्या तज्ञ सुनील कळम, कृषी अभियंता पंडित वासरे, प्रक्षेत्र व्यवस्थापक विशाल तौर यांचा समावेश होता.
या क्षेत्रीय भेटीत शास्त्रज्ञांच्या चमूने जालना तालुक्यातील निरखेडा, शिवणी, मोहाडी, ढगी, बोरगाव आणि इस्लामवाडी, मंठा तालुक्यातील वरुड, परतूर तालुक्यातील वलखेड आणि बामणी आणि घनसावंगी तालुक्यातील ढाकेफळ आणि राजेगाव या गावांना भेटी दिल्या.
मंठा, घनसावंगी, परतूर आणि जालना तालुक्यातील बहुतांश भागात पावसाभावी पेरण्या रखडल्याचे लक्षात आले. दरम्यान क्षेत्रीय भेटीच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी (५ व ६ तारखेला) जिल्ह्याच्या बहुतांश भागात बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे पेरण्यांना वेग आला आहे.
निरखेडा, ता. जालना येथील प्रदीप सुरासे यांच्या शेतात सोयाबीनची उगवण क्षमता चांगली दिसली. शिवणी येथील प्रगतशील शेतकरी उद्धवराव खेडेकर व एकनाथराव खेडेकर यांनी एकूण ६० टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या असून त्यापैकी ४० टक्के क्षेत्रावर कपाशीची झाली असल्याचे सांगितले.
मोहाडी येथील अनिल राठोड यांच्या शेतावर ४ एकर क्षेत्रापैकी २० गुंठे क्षेत्रावर भेंडी लागवड केल्याचे आढळून आले. ढगी येथील दत्ता सांगळे यांनी तूर पेरणी केली. बोरगाव येथे अशोक कायंदे यांच्या तूर शेतास भेट दिली. मंठा तालुक्यातील वरुड येथील श्रीकृष्ण हंबरे हे शेतात वखरपाळी करीत होते. असेच चित्र वैदय वडगाव, ढंगी, बोरगाव, काटशेवर या परिसरात बघायला मिळाले.
वरुडी येथील कृष्णा हंबरेसह परतूर तालुक्यातील वलखेड, बामणी येथील तरुण शेतकरी कैलास खालापूरे, धनंजय सुरुंग यांच्याशी संवाद साधला. कृषी अभियंता पंडित वासरे यांनी त्यांना जलसाक्षरता म्हणजे काय, पेरणी योग्य पाऊस, पेरणीनंतर लागणार पाऊस, पाऊस मोजणे इत्यादी माहिती सांगितली.
घनसावंगी तालुक्यातील ढाकेफळ व राजेगाव परिसरात कापूस लागवड झाल्याचे दिसून आले. कृषी विज्ञान केंद्राच्या या भेटीमुळे प्रत्यक्ष शेतावरील परिस्थितीचा अंदाज आला व त्यानुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता आल्याची माहिती तज्ञांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.