

Parbhani News परभणी ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ( हवामानाकुल कृषी प्रकल्प ः पोकरा) (POCRA Project) अंतर्गंत परभणी जिल्ह्यातील विविध घटकांची कामे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांचे १ हजार २७१ अर्ज थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) (DBT) प्रणालीद्वारे अनुदान (Agriculture Subsidy) वितरणासाठी मुंबई स्तरावर प्रलंबित आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांचे ६ कोटी ५२ लाख रुपयाचे अनुदान अद्याप थकीत आहे.
कृषी सहायक ते उपविभागीय अधिकारी स्तरावर प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्याची प्रक्रिया गतिमान नाही. परिणामी जिल्ह्यातील विविध डेस्कवर प्रलंबित अर्जांची संख्या ४०हजारांवर आहे. अद्याप एकूण वितरित अनुदान रकमेने १०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला नाही.
पोकराअंतर्गंत तीन टप्प्यांत परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील २४६ ग्रामपंचायतीअंतर्गंत २७५ गावांची निवड झालेली आहे. या गावांतील ६५ हजार ७९५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
या शेतकऱ्यांनी विविध घटकांच्या लाभासाठी १ लाख ९० हजार ३०३ अर्ज केले आहेत. त्यात फळबाग लागवड, वैयक्तिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, ठिबक, तुषार संच, शेडनेटगृह, हरितगृह, मत्स्यपालन, शेळीपालन, तुती लागवड, कृषी यांत्रिकीकरण, सेंद्रिय खतनिर्मिती, बीजोत्पादन, विहीर, विद्युत पंप, विहिरी फेरभरण आदी घटकांचा समावेश आहे.
अनुदानासाठी पडताळणीनंतर शुक्रवारपर्यंत (ता.२४) ३१ हजार ३३९ शेतकऱ्यांच्या खात्यावर ९४ कोटी ९५ लाख ७१ हजार ६०० रुपये एवढे अनुदान थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) प्रणालीद्वारे जमा करण्यात आले. परंतु कृषी सहायक डेस्क क्रमांक १ ते लेखाधिकारी डेस्क क्रमांक ६ आणि मुंबई स्तर प्रलंबित शेतकऱ्यांच्या अर्जाची संख्या ४० हजार १६२ एवढी आहे.
त्यात कृषी सहायक डेस्क क्रमांक १ स्तरावर ५ हजार ४७७ अर्ज, स्थळ पाहणी डेस्क २ वर १० हजार ५२५, शेतकरी स्तरावर १६ हजार ३५, मोका तपासणीसाठी ४ हजार ७०, उपविभागीय अधिकारी स्तरावर ९६३, अंतिम मंजुरीसाठी डेस्क ६ वर ९२१ अर्जांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांची हेळसांड
अनुदानासाठी शेतकऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रे सादर करूनही क्षेत्रिय स्तर ते जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्याकडून प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्यास महिनो अन् महिने विलंब लावला जात आहे.
त्रुटी असल्याचे कारण सांगून लाभार्थ्यांची अडवणूक केली जात आहे. अल्पभूधारक असताना बहुभूधारक असल्याचे निकष लावून अनुदान रकमेची चुकीची गणना करण्याचे प्रकार घडत आहेत.
अनेकजण शेतकऱ्याच्या अनुदानात अंशतः लाभार्थी होऊ इच्छित आहेत. संबंधित शेतकऱ्यांनी या प्रकरणी तक्रारी करून वरिष्ठ अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
एकाच कृषी सहायकाकडे अनेक गावे असल्यामुळे कामांचा ताण वाढला असल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानासाठी दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागत आहे.
प्रलंबित अर्ज तत्काळ निकाली काढावेत, अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर हस्तांतर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
प्रमुख घटकनिहाय डीबीटीद्वारे अनुदान वितरण स्थिती (कोटी रुपये)
घटक...लाभार्थी शेतकरी...अनुदान रक्कम
तुषार सिंचनऱ्थ्यां संच...१६३२३...२९.६८
ठिबक सिंचन संच...३६०१...२५.०८
फळबाग लागवड...२३१९...९.२९
शेडनेटगृह...८४...८.१८
बिजोत्पादन...४८९१...५.०७
कृषी यांत्रिकीकरण...५६८...३.९२
वैयक्तिक शेततळे...१५९...३.९५
विहीर...१८१...३.११
पाइप...१५८६...३.११
हरीतगृह...१४...१.६३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.