
राजकुमार चौगुले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Sugar Sales Quota : कोल्हापूर ः देशातील जुलैमधील साखर विक्रीची नेमकी स्थिती समजावी यासाठी केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक पुरवठा विभागाने कारखान्यांना तातडीने कारखान्यांनी स्थानिक बाजारात विक्री केलेल्या साखरेची माहिती देण्याची सूचना केली आहे. जे कारखाने ही माहिती शासनाला सादर करणार नाहीत त्यांना ऑगस्टचा विक्री कोटा मिळणार नाही, अशी तंबीही दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून देशात नेमका किती साठा आहे, याबाबत केंद्राने नेमकी माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
केंद्राने दिलेल्या कोट्यानुसार साखर कारखाने विक्री करतात का याची चाचपणी केंद्ग सरकार करत आहे. याबाबत मंगळवारी (ता. १८) एक पत्र विभागाने देशातील सर्व कारखान्यांना पाठवले आहे. या पत्रात कारखान्यांना माहिती पाठविण्याची सूचना केली आहे. ही माहिती ऑनलाईन पाठवायची आहे. कोणत्याही परिस्थितीत ही माहिती २० जुलैच्या आत प्राधान्याने पाठवायची आहे. जर एखादा समूह अनेक कारखाने चालवत असेल तर त्या समूहाने चालवत असलेल्या कारखान्यांनी विक्री केलेला कारखान्यानुसार कोटा पाठवायचा आहे.
गेल्या वर्षी अनपेक्षितपणे साखर उत्पादन कमी झाल्यानंतर केंद्र सरकार प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकत आहे. गेल्या वर्षी हंगामाच्या उत्तरार्धात निर्यातीस परवानगी दिली नाही. स्थानिक बाजारात कमी साखरेमुळे भाववाढ होऊ नये यासाठी जुलैचा कोटा गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन लाख टनांनी वाढवून दिला. कोटा वाढविल्यानंतर साखरेच्या दरात वाढ दिसून आली. यामुळे साखर कारखाने साखर विक्री करताना कोट्यापेक्षा कमी किंवा अधिक करत आहेत का याची चाचपणी केंद्राच्या वतीने करण्यात येत आहे.
केंद्राच्या वतीने देशातील एकूण साखर उत्पादनाचा व दराचा अंदाज घेऊन प्रत्येक महिन्याला साखरेचे कोटे दिले जातात. मागणी व पुरवठ्याची सरासरी कायम रहावी, ग्राहकांना महागात साखर खरेदी करायला लागू नये यासाठी केंद्राच्या वतीने प्रयत्न सुरू असतात. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून जुलैमध्ये साखर विक्रीची स्थिती काय आहे याचा अंदाज केंद्र शासन घेत आहे. कारखान्यांनी ही माहिती सादर केल्यानंतर दिलेला कोटा व एकूण विक्री याची नेमकी आकडेवारी कळेल.
साखर विक्रीची अचूक माहिती मिळविण्याचा प्रयत्न
यंदाच्या हंगामाची (२०२०-२३) सुरुवात शिल्लक ६० लाख टनांनी होण्याची शक्यता आहे. प्रत्येक वर्षी साखर हंगाम सुरू होण्याअगोदर किमान तीन महिन्यांची साखर देशात शिल्लक ठेवावी लागते. प्रत्येक महिन्यात सरासरी विक्री २० लाख टनांची धरल्यास सध्या देशात जेमतेम साखर आहे. कारखान्यांनी विक्रीची माहिती दिल्यास त्या आधारे कारखान्यांना पुढील महिन्यात किती कोटे द्यायचे हे ठरविण्यात येणार असल्याने विक्रीची अचूक माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.