
Kolhapur News : या वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादन घेतले जात असून, यामध्ये मका (मुरघास) घेतल्यास टंचाईग्रस्त जिल्ह्यांतील जनावरांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून चारा पुरवता येऊ शकेल.
यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, पावसाने ओढ दिल्यास खरिपाच्या पिकांना धोका पोहोचू नये, यासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दूधगंगा व अन्य धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.
कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा, वारणा, राधानगरी व तुळशी या धरण प्रकल्पांच्या पाण्याच्या नियोजनासाठी श्री. केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या वेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार पी. एन. पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, स्मिता माने, समरजितसिंह घाटगे आदी अधिकारी उपस्थित होते. खासदार संजयकाका पाटील, जिल्हाधिकारी राजा दयानिधी, तसेच अन्य मान्यवर दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.
दूधगंगा धरणाची गळती व दुरुस्तीबाबतच्या प्रस्तावास लवकरात लवकर मंजुरी मिळण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यात येईल, असे सांगून जिल्ह्यातील नादुरुस्त कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
याबरोबरच जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करून वाया जाणाऱ्या पाण्याचा वापर करण्यासाठी उपाययोजना करा. बैठकीत वारणा, राधानगरी, तुळशी धरणांच्या पाणीसाठ्याचेही नियोजन करण्यात आले. या तीन धरणांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध आहे. परंतु संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा विचार करून पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
बैठकीत इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत किणीकर यांनी जलसंपदा विभागाने वाढ केलेली सिंचन पाणीपट्टी कमी करावी, असे आवाहन केले. याबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. केसरकर यांनी दिल्या.
‘शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे’
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेसे पाणी उपलब्ध असून ऊस क्षेत्र सुद्धा अधिक आहे. शेतकऱ्यांनी ऊस पिकांमध्ये जनावरांसाठी मका (मुरघास) चारा पिकाचे उत्पादन घेण्यासाठी जलसंपदा व कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, तसेच हा चारा शासनाच्या वतीने विकत घेऊन राज्यातील अन्य दुष्काळी भागांतील जनावरांना पुरवता येईल यामुळे शेतकऱ्यांनाही उत्पन्न मिळेल, असे त्यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.