
India Aghadi Meeting : मुंबईत ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबरला 'इंडिया' आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीला माजी खासदार राजू शेट्टी यांना उपपस्थित राहण्यासाठी आमंत्रण आल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत माजी खासदार शेट्टी यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, मला आमंत्रण आले आहे परंतु मी या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला उपस्थित राहण्याच्या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दूरध्वनी केला होता. त्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे, अशी विनंती केली. परंतु महाविकास आघाडीबाबत मला आलेला अनुभव फारसा चांगला नाही. मोदी सरकारला विरोध करण्यासाठी 'इंडिया' आघाडीत जाणे मला आवश्यक वाटत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार व अजित पवार यांच्या गटांमध्ये सुरू असलेल्या वादावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, "या दोन्ही नेत्यांमध्ये नातेसंबंध असले तरी राजकारणातील भूमिकेत मात्र स्पष्टता आली पाहिजे. ही स्पष्टता अद्याप तरी दिसत नाही. त्यामुळे शरद पवार यांनी या संदर्भात काही कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे.'
दरम्यान पूढच्या काही दिवसात होणाऱ्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे यांनी २७ पक्षांच्या प्रमुख नेत्यांना फोनवरून निमंत्रण पाठवण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील या बैठकीला ते सर्व पक्ष उपस्थित राहणार आहेत जे बंगळुरूमधील विरोधकांच्या दुसऱ्या बैठकीत उपस्थित होते.
मुंबईत होणाऱ्या विरोधकांची तिसरी बैठक आयोजित करण्यासाठी तिन्ही पक्ष समन्वयाने काम करत असल्याचे प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार या तिन्ही पक्षप्रमुखांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या सर्व २७ पक्षांना निमंत्रण पत्रही पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईत होणारी 'इंडिया' तिसरी बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या भेटीबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीची माहिती काँग्रेस हायकमांडला दिली असून, या बैठकीतही या मुद्दय़ावर चर्चा होऊ शकते, असे सांगितले आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे राज्यातील जनतेत संभ्रम निर्माण झाल्याचे पटोले म्हणाले होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.