
Jalgaon News : खानदेशात मागील शुक्रवारी (ता. ८) व शनिवारी (ता. ९) अनेक भागात अतिवृष्टी झाली. अपवाद वगळता चांगला पाऊस झाला आहे. परंतु रविवारी (ता. १०) पावसाने विश्रांती घेतली. जोरदार पावसाने जामनेरातील (जि. जळगाव) तोंडापूर मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला आहे. तसेच. गिरणा धरणाचा साठा सोमवारी (ता. ११) सकाळी सहा वाजता ५२.२५ टक्के एवढा झाला.
गिरणा नदीवरील गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यातील नांदगावात आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव व नांदगाव तालुक्यांची सिमा एकच आहे. या धरणाचा सर्वाधिक लाभ जळगावला होतो. त्याची क्षमता १८ टीएमसी असून, सर्वात मोठा सिंचन प्रकल्प म्हणून गिरणा धरणाची ओळख आहे.
गिरणा नदीच्या उगम क्षेत्रात व नाशिकच्या पूर्व, उत्तर भागात चांगला पाऊस झाल्याने गिरणा धरणात आवक वाढली आहे. या धरणाचा साठा पाच दिवसांपूर्वी फक्त ३६ टक्के एवढा होता. त्यात मोठी वाढ दोनच दिवसात झाली आहे.
जामनेरातील (जि.जळगाव) वाघूर नदीवरील वाघूर प्रकल्पातील जलसाठाही वाढला असून, हा साठा ६२ टक्क्यांवर पोचला आहे. या धरणाची साठवण क्षमता नऊ टीएमसी आहे. तसेच जामनेरातील तोंडापूर मध्यम प्रकल्पातही १०० टक्के भरला आहे. चाळीसगावमधील मन्याड, पाचोऱ्यातील बहुळा, अग्नावती व एरंडोलातील अंजनी प्रकल्पातील जलसाठा किंचित वाढला आहे.
खानदेशात शुक्रवारी व शनिवारी अनेक भागात जोरदार ते मध्यम पाऊस झाला. काही भागात अतिवृष्टी झाली. सलग दोन दिवस अतिवृष्टी झाल्याची नोंद जळगावात करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळपासून रात्रभर सर्वत्र दमदार पाऊस झाला. तर, शनिवारी व रविवारी दिवसभरात काही वेळ उघडीप, सूर्यप्रकाश पडल्याने शेतकऱ्यांना पिकांत साचलेले पाणी काढण्यास उसंत मिळत आहे. पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे.
गेल्या सव्वा महिन्यापासून पावसाने ओढ दिली होती. दोन दिवसांपासून दमदार पावसाने पुन्हा हजेरी लावताच शेतकरी सर्व कामे बाजूला सारून शेतात पिकांची काळजी घेताना दिसू लागले आहेत. जूनमध्ये पाऊस २५ दिवस उशिराने, तर जुलैमध्ये दमदार पाऊस झाला. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पावसाने ओढ दिल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांचा हंगाम गेल्यात जमा होता. पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरवात केल्याने शेतकऱ्यांत पुन्हा नवी आशा निर्माण केली आहे.
पारोळा, भडगाव, पाचोऱ्यात अतिवृष्टी
गुरुवारी (ता. ७) पारोळा, भडगाव, पाचोरा, अमळनेरला अतिवृष्टीची नोंद करण्यात आली होती. शनिवारी पुन्हा पारोळा, पाचोरा, भडगावसह जामनेरला अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
धरणातील साठा (टक्के)
हतनूर ८०
गिरणा ५२.२५
वाघूर ६३
तोंडापूर १००
अभोडा १००
सुकी १००
मंगरूळ १००
मोर १००
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.