
नगर ः यंदा उशिराने पेरणी (Jowar Sowing) झाल्याने तसेच सततच्या बदलत्या हवामानामुळे (Climate Change) राज्यातील विविध भागांत ज्वारीचे पीक (Jowar Crop) अडचणीत आले आहे. आधीच ज्वारीचा पेरा कमी झालेला असताना आता सुमारे ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर मावा किडीचा प्रादुर्भाव झाला आहे.
त्यामुळे पानांवर चिकटा पडला आहे. त्यामुळे यंदा कडब्यासह ज्वारी उत्पादनातही घट होण्याची भीती आहे. त्यात राज्यात ढगाळ वातावरण असून, काही प्रमाणात धुकेही पडत आहे. त्याचाही ज्वारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
राज्यात रब्बी ज्वारीच्या क्षेत्रात दिवसेंदिवस कमालीची घट होत आहे. पेरा कमी होत असताना कृषी विभागाने सरासरी क्षेत्रही कमी केले आहे.
यंदा राज्यात १७ लाख ३६ हजार २६८ हेक्टर सरासरी क्षेत्र असून, १२ लाख हजार हेक्टरवर पेरणी झाली. मागील वर्षीपेक्षा यंदा ८० हजार हेक्टरपेक्षा अधिक ज्वारीचे क्षेत्र कमी झाले आहे. नगर जिल्ह्यात ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक घट झाली आहे.
यंदा अधिकच्या पावसाने ज्वारीची पेरणी कमी झाली. त्यात आता बहुतांश भागात ज्वारी हुरड्यात आहे. सुरुवातीला अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला.
आता मावा किडीचा प्रादुर्भाव व त्यानंतर चिकट्याची समस्या वाढली आहे. राज्यात नगर, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना भागांत ज्वारीचे क्षेत्र अधिक आहे.
पाणी दिलेल्या ज्वारीवर प्रादुर्भाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. चिपाडे लाल पडल्याने कडबा जनावरांना खाण्यायोग्य राहील की नाही, अशी शंका आहे. मजुरी, खते, बियाणे, आधीचा खर्च, पेरणी व काढणी खर्च वाढल्याने शेतकरी त्रस्त आहेत.
वेळीच करा नियंत्रण
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. बसवराज भेदे म्हणाले, की ज्वारीवर मावा तसेच तुडतुडे (डेल्फॅसीड) यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. सुरुवातीला पानांच्या मागील बाजूस या किडी असतात. कणीस काढण्याच्या एक महिना आधी त्यांचा प्रादुर्भाव ठळक दिसतो.
त्यांच्या शरीरातून चिकट स्राव बाहेर पडतो. त्यामुळे पानांवर साखरेसारखा चिकट पदार्थ दिसून येतो. त्यालाच चिकटा म्हणतात. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील ज्वारी सुधार प्रकल्पांतर्गत कीटकशास्त्रज्ञ डॉ. उत्तम कदम म्हणाले, की उशिराची पेरणी, ढगाळ वातावरण यामुळे काही भागात ज्वारीवर माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
हे प्रमाण कमी असले तरी दुर्लक्ष केल्यास वाढू शकते. या समस्येमुळे पाने करपतात. अधिक प्रादुर्भाव झाला तर झाडे पिवळी पडतात. झाडाच्या अन्न निर्मितीचे काम थांबते. साधारण धान्य उत्पादनात १३ टक्के, तर कडबा उत्पादनात २२ टक्के घट येऊ शकते.
६० दिवसांचे पीक झाल्यानंतर हा प्रादुर्भाव चालू होतो व नव्वद दिवसांपर्यंत तो दिसतो. प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेली कीटकनाशके, तसेच निंबोळी अर्काची फवारणी करावी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.