Pune News : राज्यात यंदाच्या गाळप हंगामात उसाची टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३० एप्रिल २०२४ पर्यंत राज्याबाहेर ऊस नेण्यास बंदी घालणारी अधिसूचना राज्य शासनाने जारी केला आहे.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी बंदीविषयक नुकतीच अधिसूचना काढली आहे. त्यामुळे राज्यातील खासगी व सहकारी साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे.
‘ऊस गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये राज्यात उसाचे आणि साखरेचे उत्पादन कमी होणार आहे. साखर आयुक्तालयाच्या अभ्यासात ही बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे यंदाचा गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने होण्यासाठी परराज्यात जाणाऱ्या उसावर बंदी घालणे आवश्यक आहे,’ असे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
ऊस नियंत्रण आदेश १९६६ मधील खंड सहामधील तरतुदींचा आधार घेत तसेच केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या अधिसूचनेतील तरतुदीमुळे राज्य शासनाला ऊस वाहतुकीवर नियंत्रण घालता येते. साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला आता पुढील हंगामाच्या ३० एप्रिलपर्यंत राज्याबाहेर ऊस नेता येणार नाही.
अर्थात, अपवादात्मक स्थितीत परराज्यांत ऊस नेण्याची गरज भासत असल्यास या बाबत राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागेल. त्यासाठी सक्षम अधिकाऱ्याकडे प्रस्ताव द्यावा लागेल. या प्रस्तावाची छाननी झाल्यानंतर आवश्यकता वाटल्यास ऊस वाहतुकीबाबत निर्णय होऊ शकेल.
गाळप हंगामाचा निर्णय मंत्रिसमितीचा ः वळसे पाटील
दरम्यान, आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) नियामक मंडळाच्या निमित्ताने राज्याच्या साखर उद्योगातील खासगी व सहकारी कारखान्यांचे उच्चपदस्थ प्रतिनिधी उपस्थित होते. यासंदर्भात सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, की ऊस उपलब्धता किती, गाळप हंगामाला कधी सुरुवात होणार हा विषय पूर्णतः राज्य शासनाच्या अखत्यारीत आहे. ‘व्हीएसआय’च्या बैठकीत त्याविषयी चर्चा झालेली नाही. गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे मत मांडले जात आहे. परंतु मंत्रिसमिती त्याबाबत योग्य निर्णय घेईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.