
राजेश कांबळे : सकाळ वृत्तसेवा
Raigad Pen News : तालुक्यातील खाडीलगत असणाऱ्या आगरी कोळी लोकांचा गेली अनेक वर्षे या भागात मिठागरांचा व्यवसाय सुरू असला, तरीही त्याला घरघर लागली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या बोरी फाट्याजवळील अनेक एकर शेती ही मिठागरांसाठी आहे.
मात्र, दहा-बारा वर्षांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी येथील जमीन भूसंपादन करण्यात आली. या भूसंपादनात अनेक मिठागरे नाहीशी झाली असून, पूर्वी १०० ते १५० असणारी मिठागरे आता १० ते १५ म्हणजेच ४० ते ५० एकर एवढ्यातच राहिली आहेत.
रायगड जिल्ह्यातील उरण, पेण आणि महाड या तीन तालुक्यांत प्रामुख्याने मिठागरे होती. त्यातील आता पेण तालुक्यातील मिठागरेही मर्यादित राहिले आहेत.
मिठागरे तयार करण्यासाठी लागणारे पूरक वातावरण, पाणी यास इतर काही वस्तू वेळेत मिळाल्या नाही, तर मिठागरांचे वाफे तयार होण्यास विलंब लागतो. या सर्व गोष्टींचा विचार केला तर यामुळेच पेणची मिठागरे नामशेष होण्याच्या मार्गावर लागली आहेत.
पूर्वी पेण तालुका हा भाताचा कोठार, त्याचबरोबर मिठागरांचा मोठा साठा असणारा म्हणून ओळखला जायचा; परंतु त्यासारखी परिस्थिती आता राहिली नाही.
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेण तालुक्यातील बोरी, शिर्की या खाडीलगत असणाऱ्या खारेपट्ट्यातील भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर मिठागरे होती.
या मिठागरांमधून स्थानिक शेतकरी कित्येक वर्ष आपला व्यवसाय करत आहेत; मात्र वाढत्या औद्योगिकरणामुळे आणि जेएसडब्ल्यू कंपनीच्या रसायनयुक्त पाण्यामुळे ही मिठागरे ओस पडू लागली आहेत.
उदरनिर्वाहासाठी धडपड
जवळपास ७० ते ७५ वर्षाचे असणारे बोरी गावातील शेतकरी मणीराम म्हात्रे यांच्यावर किडनी प्रत्यारोपण केले आहे. या वयातही ते मिठागरांमध्ये राबत आहेत. त्यांच्या मागील चार पिढ्या या मिठागरांमध्ये काम करत आहेत.
वाडवडिलांपासून चालू असलेला हा व्यवसाय आम्ही सुरूच ठेवला आहे; मात्र आता या व्यवसायाला खऱ्या अर्थाने घरघर लागली आहे. पूर्वीसारखे या व्यवसायामधून आर्थिक उत्पन्न निघत नाही.
कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना फार मोठी अडचण निर्माण होत आहे. मात्र, कितीही संकट आली, तरी वडिलोपार्जित मिठागरांच्या व्यवसायामधून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार म्हात्रे यांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.