Solapur News : सांगोला तालुक्यातील १४६ व मंगळवेढा तालुक्यातील ६१ अशा दोन्ही तालुक्यांतील एकूण २०७ चारा छावणीचालकांची सुमारे ३६ कोटी रुपयांची बिले अद्याप शासनाकडून मिळालेली नाहीत.
या दोन तालुक्यांच्या छावणीचालकांची बिले मिळत नसल्यामुळे सांगोला तहसील कार्यालयासमोर २६ जुलैपासून जनावरांसह दोन्ही तालुक्यांतील छावणीचालक आंदोलन करीत आहेत. पण प्रशासनाकडून अद्यापही त्याची दखल घेतली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
सांगोला तहसील कार्यालयासमोर हे छावणीचालक आंदोलन करीत आहेत. सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, डी. व्ही. पी. उद्योग समूहाचे प्रमुख अभिजित पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष (माढा) चेतनसिंह केदार सावंत, पुरोगामी युवक संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत, बीआरएस पक्षाचे भगीरथ भालके, आमदार समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सोमनाथ आवताडे अशा विविध पक्षांतील नेतेमंडळींनी आंदोलनस्थळी येऊन या छावणीचालकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
तसेच त्यांच्या प्रलंबित अनुदान मिळवण्यासाठी आम्हीही प्रयत्नशील असून, तुमच्या पाठीशी असल्याचे आश्वासन देत असल्याची भाषणेही दिली. पण अद्यापही छावणीचालकांच्या बिलासंदर्भात ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे सर्वच पक्षाचे नेते मंडळींचा पाठिंबा असूनही, अनुदान का मिळत नाही, असा प्रश्न आंदोलनकर्ते छावणी चालक उपस्थित करत आहेत.
छावणीचालक आर्थिक अडचणीत
जनावरांसाठी सुरू केलेल्या या चारा छावण्या २०१८-२०१९ च्या दुष्काळामध्ये सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा करूनही छावण्यांची बिले अडीच वर्षांनंतरही मिळालेली नाहीत. छावण्या बंद करण्याच्या अंतिम टप्प्यात सांगोला आणि मंगळवेढा या तालुक्यांतील जवळपास ३६ कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत.
जनावरे जतन करण्यासाठी उधारीवर घेतलेला चारा, पशुखाद्य व इतर खर्चाची देयके छावणीचालकांना देणेकराच्या दररोजच्या तगाद्यामुळे स्थानिक संस्था व बँकांची कर्जे काढून अदा करावी लागली. पण त्याची परतफेड करताना त्यांच्या नाकीनऊ आले आहे. त्यामुळे सध्या हे छावणीचालक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.