
पुणे : पुणे शहराजवळ असलेल्या हडपसर परिसरात रोपाटिकमध्ये नर्सरी (Nursery) व्यावसायिकांनी चांगलीच ओळख निर्माण केली आहे. मात्र परतीच्या मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) सोरतापवाडी, भिवापूर, उरुळी कांचन, हडपसर परिसरातील नर्सरी व्यवसायिकांचे (Nursery Businessman) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नर्सरीतील झाडे पाण्याखाली राहिली. त्यामुळे नर्सरी व्यवसायिकांना चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे अनेक नर्सरी चालक अडचणीत आले आहेत. हवेली तालुक्यातील सोरतापवाडी व परिसरातील तरुण वर्गाने शेती व्यवसायाबरोबरच नर्सरी व्यवसाय सुरू केला आहे. पण गेली दोन वर्षे हवामानाचा लहरीपणा व सतत पडणाऱ्या पावसामुळे व्यावसायिक हादरून गेले आहेत.
शेतीबरोबर शेती पूरक व्यवसाय म्हणून नर्सरी उद्योगाकडे पाहिले जाते. सोरतापवाडी परिसरातून संपूर्ण भारतात नर्सरीची रोपे विशेषतः गुलाबाची रोपे जातात. परंतु परतीच्या पावसाने गुलाबाच्या रोपांची पानगळ होऊन झाडे खराब झाली. त्यामुळे नर्सरी व्यवसाय कोलमडून पडला आहे. त्यातच मातीचे, प्लॅस्टिकचे दर, महाग झालेली खते, जागेचे वाढलेले भाडे, यामुळे नर्सरी चालविणे मुश्कील झाले आहे.
सहा वर्षांपूर्वी गुलाबाचे एक रोप १८ ते २० रुपयांना विकले जात होते. आजही तोच दर असून मजुरी, खत, माती, औषधे, जागेचे भाडे, औषध फवारणी व इतर कच्च्या मालाचे दर दुप्पट वाढले आहेत. त्यामुळे कच्च्या मालाच्या पटीत गुलाबाच्या रोपांना दर मिळत नसल्याची स्थिती आहे.
परतीच्या पावसामुळे गुलाबाची झाडे खराब होण्याचे प्रमाण ६० ते ७० टक्के आहे. राहिलेल्या ३० टक्के रोपांची छाटणी करून विक्रीसाठी आणण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो.
- शशिकांत चौधरी, नर्सरी चालक.
दिवाळीपूर्वीच शेतकरी, नर्सरी व्यावसायिकांचे दिवाळे निघाले. त्यामुळे शासनाने त्वरित शेतकरी व नर्सरी व्यवसायिकांना मदतीचा हात द्यावा.
- स्वप्नील कुंजीर, नर्सरी चालक
पावसामुळे पॉलिहाऊसमध्ये झाडे खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे.
- संतोष शितोळे, नर्सरी चालक.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.