‘एनसीडीईएक्स’कडून ‘अॅग्रोवन’चा गौरव
पुणे ः भारतातील महत्त्वाचा अॅग्री कमोडिटी एक्सचेंज (Agri Commodity) प्लॅटफॉर्म असलेल्या ‘एनसीडीईएक्स’ने (NCDEX) नुकतेच (ता. २६) शेतीमाल बाजार (Agriculture Produce) श्रृंखलेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान केला. शेतीमालाच्या बाजारभावांबाबत शेतकऱ्यांना नियमित आणि अचूक मार्गदर्शन (मार्केट इंटेलिजन्स) करून त्यांच्या समृद्धीत भर घालण्याच्या कार्याची नोंद घेऊन ‘सकाळ-अॅग्रोवन’लाही (Sakal Agrowon) यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज अर्थात ‘एनसीडीईएक्स’ने विविध श्रेणींमध्ये एकूण ५८ संस्थांचा गौरव केला. यात वृत्तपत्र माध्यमात ‘अॅग्रोवन’ला मानाचा पुरस्कार देण्यात आला. ‘अॅग्रोवन’सोबतच ‘हिंदू बिझनेस लाइन’ आणि ‘नफानुकसान’ या वृत्तपत्रांनाही पुरस्कार देण्यात आला. तसेच चार शेतकरी उत्पादक कंपन्या, टाटा म्युचुअल फंड, अल्फा अल्टरनेटिव्स, कोटक बॅंक, पंजाब नॅशनल बॅंक आणि आयसीआयसीआय बॅंकेलाही पुरस्कार देण्यात आला. व्हर्चुअल प्लॅटफॉर्मवर झालेल्या या कार्यक्रमात कमोडिटी पार्टिसिपेंट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नरिंदर वाधवा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक आणि दुप्पट शेतकरी उत्पन्न समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. दलवाई म्हणाले, की शेतीमाल मूल्यसाखळीतील घटकांनी केवळ वायदे आणि ऑप्शन्सचा उपयोग केवळ जोखीम व्यवस्थापन केले नाही तर आपल्या व्यापारातही स्थिरता आणली. शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्या पुट ऑप्शनच्या माध्यमातून पेरणीच्या काळातच आपला दर निश्चित करू शकतात. हा मूल्य जोखीम व्यवस्थापनाचा चांगला पर्याय आहे.
‘अॅग्रोवन’ मागील १७ वर्षांपासून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीपद्धतींची माहिती देत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून उत्पन्न वाढीसाठी मदत करत आहे. तसेच शेतकऱ्यांना उत्पादनातील विविध पीकपद्धती, वेगवेळ्या पिकांची माहिती पुरवत आहे. सोबतच शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला चांगला दर मिळावा यासाठी बाजारभावाची अचूक माहिती ‘अॅग्रोवन’ देत आहे. कोणत्या हंगामात पिकांना काय दर मिळू शकतो, सरकारच्या धोरणांचा बाजारभावावर काय परिणाम होईल, याची माहिती शेतकऱ्यांना मिळते. देशभरातील विविध पिकांचे भाव, तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचा देशातील बाजारावरील परिणाम याचे विवेचन ‘अॅग्रोवन’मधून दिले जाते. विविध बाजार समित्यांमधील शेतीमालाच्या भावाची माहिती रोज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली जाते. हजर बाजारासोबतच वायदे बाजाराविषयीची माहिती रोज शेतकऱ्यांना दिली जाते. देशातील कमोडिटी एक्सचेंज प्लॅटफॉर्म्सचे विविध उपक्रम आणि योजनांचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना व्हावा माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. केवळ देशातीलच नाही आंतरराष्ट्रीय पातळीवरील सीबॉट, आयसीई, युरोपियन आणि चिनी वायदे बाजारांतील माहितीचे विश्लेषण करून देशातील शेतकऱ्यांना याचा कसा लाभ होईल, त्यादृष्टिने वार्तांकन केले जाते.
महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापूस ही दोन महत्त्वाची पिके आहेत. खरिपात या दोन पिकांखाली जवळपास ८० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्र आहे. ‘अॅग्रोवन’ने चालू हंगामात शेतकऱ्यांना रोज या दोन्ही पिकांच्या बाजारभावाची माहिती पुरवली. सरकारचे आयात-निर्यात धोरण आणि त्याचे बाजारावरील संभाव्य परिणाम याचे अचूक विश्लेषण दिले. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील विश्लेषकांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन ‘अॅग्रोवन’च्या माध्यमातून मिळाले. परिणामी यंदा सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना आपला शेतीमाल विक्रीसाठी निर्णय घेण्यास मदत झाली. बाजारांतील अफवांच्या काळात ‘अॅग्रोवन’ने बाजारातील वास्तव मांडले. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजाराचा अंदाज येऊ शकले. याच कार्याची दखल घेत ‘एनसीडीईक्स’ने ‘अॅग्रोवन’चा पुरस्काराने गौरव केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.