
Nandurbar News : आठवडाभरापासून पावसाला सुरवात झाली आहे. कुठे कमी, तर कुठे जास्त प्रमाणात पाऊस सुरू आहे. चार दिवसांपासून रोज पावसाची हजेरी लागत आहे. तीन दिवसांपासून श्रावणमास सुरू होण्यापूर्वीच श्रावणसरींचा अनुभव नंदुरबार जिल्हावासीय घेत आहेत.
शनिवार (ता. १५)अखेर १४६ मिलिमीटर पावसाची नोंद प्रशासनाकडे झाली आहे. त्यात नवापूर, नंदुरबार, शहाद्यात कमी, तर अक्राणी, अक्कलकुवा, तळोद्यात सर्वाधिक पाऊस झाल्याचे चित्र आहे.
जून कोरडा गेला, असे म्हटले तरी चालेल. खरिपासाठी शेतीची मशागत करीत शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाले असून, ते पावसाची वाट पाहत होते. हवामान विभागाने नंदुरबार जिल्ह्यात १६ जूनपासून पावसाचा अंदाज वर्तविला होता.
मात्र २७ जूनपर्यंत थेंबभरही पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र २७ जूनला रात्री जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर उघडीप मिळताच शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली. तसेच मोठ्या प्रमाणात पेरणची कामेही आटोपली. मात्र पुन्हा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस गायब झाला.
त्यामुळे शेतकरी सुरवातीस पाऊस नाही म्हणून चिंतेत तर नंतर आठवडाभरात पाऊस नाही म्हणून पेरणी केलेले बियाणे किडे खाऊन जातील. बियाणे-खत वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट ओढावतेय की काय, या चिंतेत पडले.
मात्र १० जुलैपासून पुन्हा पावसाला सुरवात झाली. तीन दिवसांपासून तर संततधारेप्रमाणेच पाऊस सुरू आहे. दिवसभरातून श्रावणसरीप्रमाणे पावसाचे येणे-जाणे सुरू आहे. त्यामुळे पेरणी झालेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यांची ज्वारी, मका, मूग-उडीद हवेत डोलू लागले आहेत.
तापीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
तापी नदीवरील हतनूर धरणाचे दहा गेट १.०० मीटरने उघडून एकूण १९ हजार ४२३ क्यूसेक इतका विसर्ग तापी नदीपात्रात सुरू आहे. त्याचप्रमाणे सुलवाडे बॅरेज मध्यम प्रकल्पाच्या पातळीत वाढ झाल्यामुळे चार दरवाजे एक मीटरने उघडून एकूण १३ हजार ३३५ क्यूसेक इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
तरी संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्यातील सांरगखेडा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे चार दरवाजे एक मीटरने उघडून एकूण १४ हजार २५५ क्यूसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे पाच दरवाजे एक मीटरने उघडून एकूण १७ हजार ६७५ क्यूसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. पाण्याचा वेग लक्षात घेता वरील दोन्ही प्रकल्पांतून विसर्ग वाढविण्यात येऊ शकतो.
तरी तापीकाठावरील गावांतील नागरिकांना याद्वारे सूचना देण्यात येत आहे, की तापी नदीपात्रामध्ये कुणीही जनावरे सोडू नये अथवा कोणीही तापी नदीपात्रात जाऊ नये. नदीतील पंप सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. याबाबत नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.