नगर ः जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून मागणीनुसार निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. २०२२-२३ या वर्षासाठी ७५३.५२ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर असून सर्व विभागांनी हा निधी पूर्णपणे खर्च होईल, यादृष्टीने काटेकोर नियोजन करुन सर्व विभागांनी येत्या तीन दिवसांमध्ये प्रशासकीय मान्यतेसाठीचे प्रस्ताव नियोजन विभागाकडे सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhkrushna Vikhe - Patil ) यांनी दिली.
नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत आढावा बैठक झाली. खासदार सदाशिव लोखंडे, खासदार सुजय विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, डॉ. किरण लहामटे, मोनिका राजळे, लहू कानडे, संग्राम जगताप, आशुतोष काळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, नियोजन अधिकारी निलेश भदाणे उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले, २०२२-२३ साठी ७५३.५२ कोटी रुपये मंजुर आहेत. वर्षात संपूर्ण निधी खर्च होईल, यादृष्टीने काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे. पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने प्रत्येक विभागाने प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव येत्या तीन दिवसांमध्ये नियोजन विभागाकडे सादर करण्याच्या सुचना करत आहे. २०२३-२४ या वर्षासाठी शासनाने दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिकचा निधी मंजूर करण्यासाठी वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत अधिकच्या निधीची आग्रही मागणी करणार.
धार्मिक पर्यटनाला अधिक प्रमाणात चालना देऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी या दोनही पर्यटन विकासाचा आराखडा तयार करण्यात यावा. यासाठी आवश्यक असणारा निधी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येईल. पर्यटकांना सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहाचे नुतणीकरणाबरोबरच इतर विकासकामे हाती घेण्यात येईल. नगर जिल्ह्यातील रोजगार निर्मितीमध्ये अधिक प्रमाणात वाढ होऊन बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी आयटी पार्क उभारणीसाठी जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती तसेच शासकीय जमिनी उपलब्धतेचा आढावा घेण्यात यावा. रोहित्रे उपलब्ध नसल्याने तसेच ती नादुरुस्त असल्या कारणाने अनेकवेळा ग्रामीण भागातील जनतेला वीज पुरवठा करताना अडचणी येतात. विनाखंडीत वीज पुरवठ्यासाठी तालुकानिहाय रोहित्रांची बॅंक उभारण्यात येणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.