
Pune News पुणे ः कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम (Hapus Mango Season) संपल्यानंतर जूनमध्ये पुणे आणि मुंबईच्या बाजारपेठेत पुणे जिल्ह्यातील विविध आंब्याचा हंगाम सुरू होतो. मात्र यंदाच्या हंगामावर अवकाळीचे सावट (Unseasonal Rain) असून, हवामान बदलामुळे (Climate Change) यावर्षी झाडांना पालवी जास्त आणि मोहोर कमी लागला आहे.
त्यातच गेल्या दोन दिवसांत पडलेल्या पावसाने आलेला मोहोर गळाला असून, तो कुजण्याच्या शक्यतेने उत्पादन (Mango Production) ५० टक्क्यांपर्यंत घटण्याची भीती आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पुणे जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आदी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हापूस, केसर आणि राजापुरी या आंब्याची लागवड आहे. तर पूर्व पट्ट्यातील शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर या तालुक्यांमध्ये केसर आंब्याच्या लागवडीचे प्रमाण मोठे आहे.
पुणे जिल्ह्यातील गावरान आंब्याची स्वतंत्र बाजारपेठ असून, कोकणातील आंब्याचा हंगाम मे च्या अखेरिस संपल्यानंतर या गावरान आंब्याचा हंगाम सुरू होतो. या आंब्याचा विशेष ग्राहक वर्गदेखील निर्माण झाला आहे. तर स्थानिक आठवडे बाजारात आंब्याचा बाजारदेखील बहरत असतो.
मात्र यंदाच्या हंगामावर जानेवारी-फेब्रुवारीपासून बदलत्या हवामानाचे संकट आहे. याबाबत सांगताना येणेरे (ता. जुन्नर) येथील पारंपरिक आंबा उत्पादक शेतकरी बाजीराव ढोले म्हणाले, की यावर्षीच्या हंगामाच्या सुरुवातीलाच झाडांना जास्त पालवी आणि मोहोर कमी लागला. यामुळे पालवीच्या पोषणासाठी जास्त अन्नद्रव्ये वापरली गेल्याने मोहोराचे प्रमाण कमी होते.
त्यातच गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण, पाऊस यामुळे मोहोर भिजला असून, बोराच्या आकाराच्या कैऱ्या गळून पडल्या आहेत. तर काही मोहोर भिजल्याने तो कुजण्याची भीती निर्माण झाली आहे.
त्यातच फवारणीचा खर्च वाढाला असून पाऊस दोन-तीन दिवस राहणार असल्याने फवारणीदेखील करू शकत नाही. अशा विचित्र परिस्थितीत आंब्याचे उत्पादन ५० टक्क्य्यांपर्यंत कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.