
Pune News : जिल्ह्यातील अवर्षणप्रवण असलेल्या बारामती तालुक्यात ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांनी विहिर आणि विंधनविहिरी खोदण्याची वेळ आली आहे. यंदाच्या मॉन्सूनने बारामती तालुक्याकडे पाठ फिरविल्याने ओढे, बंधारे, विहिरी अद्याप कोरड्याच असल्याने अनेक ठिकाणी पेरण्याच झालेल्या नाहीत तर अनेक ठिकाणी झालेल्या पेरण्यांची पिके सुकायला लागली आहेत. यामुळे खरिपाच्या उत्पादनावर परिणामाबरोबरच पशुधनाच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न बिकट झाला असून, शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
बारामती तालुक्यात जूनपासून गेल्या तीन महिन्यांत ऑगस्ट दरम्यान पावसाने हुलकावणी दिली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बारामती, पुरंदरच्या शिवेवर असलेल्या संदीप पवार यांच्या शेतात सध्या ५० फूट खोल विहीर खोदण्याचे काम सुरू झाले आहे. याबाबत पवार म्हणाले, ‘आमची साडेसात एकर शेती असून, ४ एकर ऊस आहे तर उर्वरित साडेतीन एकरवर बाजरी, ज्वारी आणि कांदा पिकाचे नियोजन होते.
शेत नांगरून पडली आहेत. पण गेल्या तीन महिन्यांत समाधानकारक पाऊसच न झाल्याने पेरण्या रखडल्या आहेत. पावसात उसाला पाणी मिळेल अशी आशा होती. पण ऊस पण आता सुकायला लागला आहे. ऑगस्ट महिना निम्मा संपला तरी अजून पाऊस नाही. जो पाऊस होतो त्याने अंगावरचे कपडेसुद्धा भिजत नाहीत.
अशा पावसाचा काहीच उपयोग होत नाही. पाऊसच होत नसल्याने आता ५० फूट खोल आणि ३० फूट व्यासाच्या विहिरीचे काम सुरू केले आहे. यासाठी तीन चार लाखांचा खर्च आहे. अजून विहिराला पाणी लागले नाही. पण पावसाचा झिरपा झाला तर पाणी राहिल अशी आशा आहे.’
माळवाडी (ता. बारामती) येथील शेतकरी सुरेश लोणकर म्हणाले, ‘२ एकर बाजरी आणि २ एकर चाऱ्याची लागवड केली होती. पण पावसाने दोन्ही पिके जळाली आहेत. माझ्याकडे चार गाया आहेत. आता गायांसाठी चारा आणि पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
३ हजार २०० रुपये टन चाऱ्याचा दर आहे. तर बाराशे रुपयांना पाण्याचा टॅंकर विकत घ्यावा लागतो. चार दिवस चारा तर दोन दिवस पाणी पुरते. धरणातून पाणी सोडायची गरज आहे. पण धरणातच पाणी नाही तर काय मागणी आणि कोणाकडे करणार अशी व्यथा लोणकर यांनी मांडली.’
माळवाडी येथील कृषी पदवीधर असलेले अनिल लडकत कृषी सेवा केंद्र चालवितात. कृषी सेवा केंद्रांवर देखील आता शुकशुकाट असल्याचे सध्याचे वास्तव आहे. लडकत म्हणाले, ‘परिसरात पाऊसच नसल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या करण्यासाठी हात आखडता घेतला आहे. यामुळे खते बियाणे खरेदीसाठी शेतकरी येत नाहीत. दिवसभर दुकानात शुकशुकाट असतो.’
शरद गायकवाड (रा. मोरगांव) म्हणाले, ‘पाऊस नसल्याने सगळ्याच अडचणी वाढल्या आहेत. माझ्याकडे ६ एकर शेती आहे. यामध्ये ऊस दीड एकर लावलेला आहे. इतर शेतीत बाजरी आणि चारा पिके घेतो. माझी विहीर नदीच्या जवळ असल्याने पाणी आहे. मात्र ते जपून वापरावे लागत आहे. पाऊस असता तर ते पाणी वाचवता आले असते. पावसाच्या आशेवर आहे, पण बाजरी अजून म्हणावी तशी उगवलेली नाही. ऊन वाढले तर बाजरीला फटका बसेल.’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.