
Nashik News : भाताचे आगार असलेल्या इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाने काही दिवसांपासून दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच गाव व वाड्यापाड्यांमध्ये भात लावणीच्या कामांना वेग आला आहे.
या तालुक्यात एकेकाळी मोठ्या संख्येने मजूर होते. काही वर्षांपासून या तालुक्यात उद्योगधंदे नसल्यामुळे शेकडो मजूर शहरी भागातील कारखान्यात काम करण्यासाठी स्थलांतर करतात. त्यामुळे शेतमजुरांची उपलब्धता नसल्याने भाताची लागवड कशी करायची असा प्रश्न दरवर्षी नित्याचा झाला आहे.
यंदा एकीकडे पाऊस लांबला तर दुसरीकडे शेतकऱ्याचे नियोजन बिघडले. आता एकच कामाची लगबग आल्याने मजुरांची टंचाई भासत आहे. इगतपुरी तालुक्यात १२४ महसुली गावे आणि १५० हून अधिक पाडे आहेत. तालुक्यात दर वर्षी ३० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात भाताची लागवड केली जाते.
येथील शेतकरी सुरती, गुजरात ११, गुजरात थाळी, रत्ना, सुवर्णा, कर्जत, इंद्रायणी, सह्याद्री, सोनम हाळी, ‘आर २४’, ‘जीओ’, ‘एक हजार आठ’, ‘राधा फुले’ आणि ‘मसुरी’ आदी भाताच्या वाणांची लागवड करतात. येथील इंद्रायणी हा भाताचा वाण प्रसिद्ध आहे. मात्र भात लावणीसाठी जिल्ह्यात कुठेही यांत्रिक अवजारे नाहीत. भात लावणी यंत्रे महागडी असल्याने ती शेतकऱ्यांना परवडत नाहीत, असे शेतकरी म्हणतात.
परंपरेनुसार शेतातील देवांना पोळी भाजीचा नैवेद्य देऊन शेतकऱ्यांनी कामांना सुरुवात केली. मात्र एकाच वेळी लावणीच्या कामांना सुरुवात झाल्याने मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे खर्डी, शहापूर, कसारा, आसनगाव, उंबरमाळी, जव्हार, मोखाडा व नाशिक या ठिकाणांहून मजूर आणावे लागत आहेत.
महागलेली भातशेती परवडेना
मजुरांचे दरही दिवसेंदिवस वाढत आहेत. एका शेतमजुराला रोज ३०० ते ३५० रुपये आणि जेवणाचा खर्च द्यावा लागतो. यामुळे शेती जास्त कष्टाचा आणि खर्चिक झाली आहे. त्यामुळे भातशेती करणे परवडत नाही. या वर्षी ३० ते ४० टक्के पेरभात शेती झाली आहे. भात पेरणीच्या वेळेवरच शेताची चांगली मशागत करून पेरभात शेतात टाकले जाते.
त्याला पुन्हा लावण्याची गरज नसते. हे काम कमी मनुष्यबळातही होते. तालुक्यातील अनेक शेतकरी वर्षभर खायला लागेल एवढी भातशेती करतात. त्यामुळे उर्वरित क्षेत्र ओस पडण्याची भीती आहे. भाताचे भाव अनेक वर्षांपासून आहेत तेच आहेत. त्यामुळे महागलेली भातशेती परवडत नसल्याची स्थिती आहे.
आधुनिक पद्धतीचा अवलंब
सध्या शेतकरी पारंपरिक पद्धतीला छेद देत आधुनिक शेतीकडे वळला आहे. शेतकरी आता मल्चिंग शेती, एसआरटी, एसआरआय, डम सीडर, बावचा, वापे पद्धतीची भातशेती करत आहेत. तालुक्यात एसआरटी भातशेती सुमारे ५० एकर, तर मल्चिंग सहा ते सात एकर क्षेत्रात केली असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.