
अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : पुरंदर तालुक्यात कृषी विभागाचे (Agriculture Department) काम ग्रामस्तरावर अधिक गतिमान होण्यासाठी आणि गावातील शेतकऱ्यांना गावातच कृषी विषयक सर्व योजनांची माहिती तसेच तंत्रज्ञान मिळण्याच्या उद्देशाने आमदार संजय जगताप यांनी पुरंदर तालुक्यातील ५ गावांत कृषिभवन बांधण्याचे ठरविले आहे. यापैकी कुंभारवळण येथे पहिल्या कृषी भवनाचे उद्घाटन सोमवारी (ता. १२) करण्यात आले. उर्वरित हिवरे, मांढर, वाघापूर, कोळविहिरे या गावांत कृषिभवन बांधण्यासाठी भूमिपूजन केले.
माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या (ता. १२) निमित्ताने कुंभारवळण येथे पहिल्या कृषी भवनाचे उद्घाटन
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार संजय जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी बारामती वैभव तांबे, तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव हे उपस्थित होते. कार्यक्रमप्रसंगी ट्रॅक्टर व अनुदानित इतर अवजाराचे वाटप करण्यात आले.
कृषी भवनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या सर्व योजना एका छताखाली आणि गाव पातळीवर उपलब्ध होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान व बाजारपेठ यांचे ज्ञान गावात उपलब्ध होणार असल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचे मत आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केले.
कृषी भवनातील उपलब्ध सुविधा :
- कृषी विभागाच्या सर्व योजनांचे माहिती फलक कृषिभवनामध्ये प्रदर्शित करण्यात आलेले आहेत.
- महाडीबीटीअंतर्गत कृषी विभागाच्या सर्व योजनांचे अर्ज ऑनलाईन करून देण्याकरिता इंटरनेट सुविधा व मनुष्यबळ शेतकऱ्यांच्या सेवार्थ उपलब्ध करून दिले आहे.
- कृषीविषयक सर्व बाबींचे वाचनालय उपलब्ध करण्यात आले असून, त्यातून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे.
- कृषिभवनच्या छतावर पर्जन्यमापक बसविलेला असून त्यामुळे पावसाच्या दैनंदिन नोंदी घेणे शक्य होणार आहे आणि त्यानुसार
पिकाचे नियोजन, पाणी नियोजन शक्य होणार आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात सदर नोंदींची मदत होणार आहे.
- कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन, शेडनेट, हरितगृह, कोल्ड स्टोरेज, कांदा चाळ, डाळमिल शेततळे खोदाई, शेततळे अस्तरीकरण, विविध अन्नप्रक्रिया योजना, फळबाग लागवड योजना याबाबत माहिती घेऊन गावातच अर्ज करता येईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.