
Kolhapur Rain News : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा आणि शाहुवाडी तालुक्याला वरदान ठरलेला कासारी मध्यम प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहे. पन्हाळा तालुक्यातील ४१ तर शाहूवाडी तालुक्यातील २१ गावांना कासारी मध्यम प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा होतो. २.७७ टीएमसी असलेले कासारी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असल्याची माहिती कासारी धरण शाखा अभियंता एस. एस. लाड व आय. जी. नाकाडे यांनी दिली.
२.७७ टीएमसी असलेला कासारी मध्यम प्रकल्प सध्या ९७ टक्क्यांपेक्षा जास्त भरला आहे. दरम्यान या धरणाची पाणीपातळी ६२२.६० मीटर इतकी असून धरणात ७६.४७ दलघमी एवढा पाणीसाठा सध्या आहे. पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यात असलेल्या कासारी पाणलोट क्षेत्रात ऑगस्ट अखेर ३६९६ मिमी इतका पाऊस झाला आहे.
दरम्यान मागच्या वर्षी ३६७६ मिमी पाऊस झाला होता. गतवर्षीपेक्षा यंदा २२ मिमी पाऊस जादा या भागात झाला आहे. याचबरोबर मागच्या २४ तासांत १८ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. परंतु या महिन्यात अत्यंत कमी पावसाची नोंद शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यात झाली असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या कासारी मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग बंद आहे.
दरम्यान या धरण पाणलोट क्षेत्रात १ ते ३० जून दरम्यान ४७२ मि.मी पावसाची नोंद झाली होती तर २२.६६ इतका पाऊस झाला होता. याचबरोबर १ ते ३० जुलै दरम्यान २४०८ मि.मी पावसाची नोंद झाली होती तर ५७.६१ पावसाची नोंद झाली होती. एकूण दोन महिन्यात २८८० मि.मी पावसाची नोंद झाली आहे.
कासारी पाणलोट क्षेत्रात गेळवडे या प्रमुख मध्यम प्रकल्पासह कुंभवडे, केसरकरवाडी, पोबरे, पडसाळी व नांदारी हे लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत. हे पाचही लघू प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मागील वर्षी याच दिवशी पाणीसाठा ७६.४७ दलघमी इतका होता. तर धरण २.७० टीएमसी म्हणजे ९७ टक्के भरले होते, अशी माहिती पाटबंधारे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.