
Ratnagiri News : मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले असून खेडमध्ये जगबुडी, चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीला पूर आला. पुराचे पाणी किनाऱ्यावरील लोकवस्तीत शिरल्यामुळे खेड, चिपळूणातील सुमारे दीडशेहून अधिक नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले. पुराची शक्यता लक्षात घेता दोन्ही तालुक्यांतील शाळांना सुट्टी जाहीर केली.
मंगळवारी (ता. १८) रात्रीपासून वेगवान वाऱ्यांसह जोरदार पाऊस सुरू झाला आहे. खेड शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागाला पावसाने झोडपून काढले. जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. संततधार पावसामुळे खेड मटण-मच्छी मार्केट परिसरासह देवणे बंदर भागात जगबुडी नदीचे पुराचे पाणी घुसले. खारी गावातील ४ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले.
तर खांब तळे येथील नागरिकांना पालिका बालवाडी येथील शाळेत हलविण्यात आले. जजगबुडी नदीने ९ मिटरची पाणी पातळी गाठली. चिपळूणमधील कोळकेवाडी धरण व परिसरात मंगळवारी (ता. १८) रात्री ८ पासून मुसळधार पाऊस सुरू झाला. येथील महाजेनकोचे तीन युनिट चालू असल्यामुळे वक्रदारद्वारे सांडव्यावरून पाणी विसर्गाची शक्यता आहे.
वशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली. नाईक कंपनी, मच्छी मार्केट, वडनाका येथे १ फूट पाणी साचले. उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून माहिती घेतली. मिरजोळी जुवाड येथील १९ कुटुंबातील ६५ व्यक्तींना नातेवाईकांच्या घरी तर बोरघर (कातकरी वस्ती) येथील ४ घरांतील २२ लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले.
दरम्यान, बुधवारी (ता. १९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ९२.८१ मिमी पाऊस झाला. त्यात मंडणगडमध्ये ९५.४० मिमी, दापोली ११०.८०, खेड १५१, गुहागर ७६.३०, चिपळूण १५६.५०, संगमेश्वर ८२.१०, रत्नागिरी ३४.२०, लांजा ६२.४०, राजापूर ६६.८१ मिमी पाऊस झाला. १ जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी १२६७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.