कोल्हापूर ः कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (KDCC Bank) ठेवीवरील व्याजदरात भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेचे (Bank) अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या व्याजदराच्या वाढीनंतर ठेवीवरील कमाल व्याजदर साधारणतः ७.९० टक्के होतो. येत्या काळात लवकरच बँकेने नऊ हजार कोटी रुपयांच्या ठेवींचे उद्दिष्ट गाठण्याचा संकल्प केला आहे.
रिझर्व्ह बँकेने त्यांच्या रेपो दरात वेळोवेळी वाढ केली असून महागाई निर्देशांक कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. रिझर्व बँकेने वाढवलेले रेपो दर विचारात घेऊन केडीसीसी बँकेने आपल्या ठेवीच्या व्याजदरामध्ये १०० बेसिस पॉईंट म्हणजेच साधारणता एक टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.
दरम्यान, बँकेने एक जुलै २०२२ पासून ज्यादा व्याजदराच्या दोन आकर्षक ठेव योजना सुरू केल्या आहेत. राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त जादा व्याजदराच्या यशवंत पुनर्गुंतवणूक आणि यशवंत रिकरिंग पुनर्गुंतवणूक या दोन ठेव योजना सुरू केलेल्या आहेत. त्यांनाही ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनांमध्ये आतापर्यंत ३५० हून अधिक कोटींच्या ठेवी जमा झालेल्या आहेत. या योजनांमध्ये ठेवण्याची शेवटची मुदत ३१ डिसेंबर २०२२ अखेर आहे.
मुश्रीफ म्हणाले, की जिल्ह्यातील एकूण ठेवींपैकी २० टक्के ठेवी या आमच्या बँकेकडे आहेत आणि उर्वरित ८० टक्के ठेवी इतर बँकांत ठेवल्या जातात. जिल्ह्यातील पैसा जिल्ह्यातच राहावा जेणेकरून जिल्ह्यातील शेतकरी व संस्थांच्या विकासाकांमी तो वापरात येईल. म्हणून बँकेच्या विविध ठेव योजनांमध्ये जास्तीत जास्त ठेवी ठेवून या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले. या वेळी खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैय्या माने, संतोष पाटील, सुधीर देसाई, प्रा. अर्जुन आबिटकर, विजयसिंह माने आदी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.