Almatti Dam : पश्चिम महाराष्ट्राला पूरस्थिती निर्माण करणाऱ्या अलमट्टी धरणाच्या पाणी पातळीत वाढ, जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना

Kolhapur Collector : कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी अलमट्टी धरणाबाबत महत्वाचा खुलासा केला आहे.
Almatti Dam
Almatti Damagrowon

Maharashtra News : महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर येण्याचे मुख्य कारण अलमट्टी धरणातील पाणीसाठा ठरला आहे. अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग होत नसल्याने सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना २००५, २०१९ आणि २०२१ या साली महापुराने थैमान घातले या सगळ्याला कारणीभूत अलमट्टी धरणाचे बॅक वॉटर असल्याचे बोलले जाते. यावर कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी अलमट्टी धरणाबाबत महत्वाचा खुलासा केला आहे.

कर्नाटकमधील आलमट्टी धरणातील पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात सध्यातरी मोठा पूर येईल, अशी भीती नाही. मात्र, जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

नदीकाठच्या लोकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. ज्या- त्या गावातील अधिकाऱ्यांनी सतर्क राहून पूरस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

आलमट्टी धरण पन्नास टक्के भरत आल्यानंतर त्यांच्याशी समन्वय साधला जाईल. याचे नियोजन झाले आहे. सध्या मात्र कोल्हापूर जिल्ह्यातच जोरदार पाऊस सुरू आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढत असली तरीही आज (ता.२४) दुपारपर्यंत कोणाच्याही घरात पाणी शिरले आहे, अशी माहिती आलेली नाही.

तरीही नदीकाठच्या लोकांना दक्षतेचा इशारा दिला आहे. बुधवारी (ता. २६) अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. कधी यलो, तर कधी ऑरेंज अलर्ट जाहीर केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिली.

जिल्हाधिकारी रेखावार पुढे म्हणाले की, जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांसह नद्यांची पाणी पातळी वाढत आहे.

त्यानुसार जिल्ह्यात दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. अतिवृष्टी असणाऱ्या आणि डोंगर पायथ्याखाली असणाऱ्या गावांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. अतिवृष्टी होत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी ज्या त्या गावात दिवसातून तीनवेळा भेट देऊन डोंगरमाथ्यांची माहिती घ्यायची आहे. दरम्यान, आज पावसाने काही काळ विश्रांती घेतली असली तरीही पाणी पातळीत वाढ होत आहे.

Almatti Dam
Koyna Dam Satara : कोयना धरण भरण्यासाठी अद्यापही ६६ टीएमसी पाण्याची आवश्यकता

अलमट्टीमध्ये पावसाचा जोर वाढला

अलमट्टी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणातील पाण्याचा साठा वाढला आहे. कर्नाटक पाटबंधारे खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी अलमट्टी धरणातील एकूण पाणीसाठा ४४.४९५ टीएमसी तर जिवंत पाणीसाठा २६.८७५ टीएमसी इतका झाला आहे.

गतवर्षी २२ जुलै रोजी धरणातील एकूण पाणीसाठा ९६.८६१ टीएमसी तर जिवंत पाणीसाठा ७९. २४१ टीएमसी इतका होता. अलमट्टी धरणाची पाणी साठविण्याची क्षमता १२३.०८ टीएमसी इतकी आहे. कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या या धरणाची चर्चा २००५ सालापासून सातत्याने होते.

आलमट्टीतून अजून विसर्ग नाही

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला की आलमट्टी व हिडकल या दोन धरणातील पाणीसाठ्यात वाढ होते; पण महाराष्ट्रातील कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला की, आलमट्टी धरणातूनही विसर्ग सुरू करण्याची मागणी केली जाते; पण यंदा अद्याप तशी स्थिती उद्भवलेली नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com