Agriculture Pump Theft जळगाव/ मेहुणबारे : खानदेशात शेतात ठिबकच्या नळ्या, पशुधन, कापूस, वीजपंप, वीजपंपाची यंत्रणा आदी चोरीच्या (Cotton Theft) घटना मागील दीड महिन्यात सतत वाढल्या आहेत. यामुळे शेतीमालाच्या (Agriculture Produce) कमी दरांमुळे अडणीत अससेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
याबाबत मुख्य पोलिस ठाण्यात मिळून १०० पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. जनावरांसह शेतातील वीजपंप, स्टार्टर व अवजारे चोरी होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे.
सातपुडा पर्वतालगत आणि नदीकाठच्या, महामार्गालगत या घटना वाढल्या आहेत. नंदुरबारात अलीकडेच तळोदा येथे एका शेतात ठिबक नळ्या चोरीचा प्रयत्न शेतीमालकाच्या धाडसाने फसला. चोरटे सापडले. परंतु इतर भागांत मात्र चोऱ्या वाढल्या आहेत.
उन्हाळा असल्याने वीजपंपावरील यंत्रणा चोरल्यानंतर पिकांचे सिंचन करणे अशक्य होते. पिके वाळून नुकसान होते.
अलीकडेच फुपनगरी (ता. जळगाव) येथील शिवारात सुमारे चार शेतकऱ्यांच्या कूपनलिकांच्या केबल, स्टार्टरची यंत्रणा चोरट्यांनी काढून नेली. या घटनेबाबत पोलिसात गुन्हा दाखल झालेला नसला, पण पोलिस रात्रीच्या वेळी गस्त करतात की नाही, हा प्रश्नही आहे.
जनावरांची कशी घ्यावी काळजी
ग्रामस्थांनी आपली गुरे ढोरे, शेतात किंवा रस्त्याच्या बाजूला अथवा निर्जनस्थळी किंवा दूरवर बांधू नये. आपली जनावरे ज्या ठिकाणी बांधली जातात त्या ठिकाणाला (खळ्यात) चारही बाजूंनी कुंपण करून बंदिस्त करावे. शक्य असल्यास आपली गुरे गावाजवळ किंवा आपण राहत असलेल्या ठिकाणी जवळपास बांधावी. रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी लाइटची व्यवस्था करावी.
संशयितांवर राहणार नजर
पोलिसांनी प्रत्येक गावात किंवा शेताच्या सभोवताली संशयित फिरणाऱ्या व्यक्तींवर त्या गावातील ग्रामस्थांना लक्ष ठेवायला सांगितले आहे. परिसरात रात्रीअपरात्री कुणीही संशयिताचे वाहन दिसल्यास तातडीने पोलिसांना कळवावे.
लोकसहभागातून सीसीटीव्ही बसवावे...
खानदेशात प्रमुख गावांत सार्वजनिक ठिकाणी लोकसहभागातून किंवा ग्रामंपचायतीमार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कुठेही काही चुकीची घटना, चोरीची घटना याबाबत संकेत मिळाल्यास पोलिसांना संपर्क करावा. जेणेकरून चुकीच्या कामांना आळा बसेल, असे जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हा पोलिसांनी म्हटले आहे.
रात्रीच्या वेळी गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना सहकार्यासाठी प्रत्येक गावातील नागरिकांनी ग्रामस्तरावर स्थानिक पोलिस मित्रांचे ग्राम सुरक्षा दल स्वयंस्फूर्तीने स्थापन करून पोलिसांना सहकार्य करावे. जेणेकरून आपल्या भागातील होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा बसेल.
- विष्णू आव्हाड, सहायक पोलिस निरीक्षक, मेहुणबारे (ता. चाळीसगाव, जि. जळगाव)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.