Sugarcane Crushing : पहिल्या पंधरवड्यात केवळ ४३ कारखाने सुरू

पावसाचा फटका; केवळ १२ लाख टन उसाचे गाळप
Sugarcane Crushing
Sugarcane CrushingAgrowon


राजकुमार चौगुले : ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : राज्यात परतीच्या पावसाचा जबरदस्त फटका यंदाच्या ऊस हंगामाच्या प्रारंभाला बसला आहे. पहिल्या पंधरवड्यात केवळ ४३ कारखाने सुरू झाले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत २०० पैकी ७८ साखर कारखान्यांनी गळीतास प्रारंभ केला होता. यंदा ऑक्टोबरअखेर संपलेल्या पहिल्या पंधरवड्यात राज्यात केवळ १२ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane Crushing) झाले. तर पुणे विभागात सर्वाधिक ५ लाख टन उसाचे गाळप झाले आहे.



Sugarcane Crushing
Sugarcane Crushing : गाळप हंगामाला अखेर सुरुवात

ऑक्टोबरच्या पहिल्या सप्ताहापासून ते मध्यापर्यंत राज्यातील बहुतांशी भागाला पावसाने झोडपून काढले. दररोज सायंकाळी मुसळधार पाऊस होत असल्याने शिवारात अक्षरशः तळे साचले. ऊस हंगामाच्या प्रारंभीच शिवारामध्ये पाणीच पाणी होते. यामुळे निर्धारित १५ ऑक्टोबरच्या दरम्यान अगदी बोटावर मोजण्याइतकेच कारखाने सुरू झाले. विशेष करून पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक नामवंत कारखान्यांनी पावसाची परिस्थिती पाहून आपला हंगाम उशिरा सुरू करण्याचे ठरवले. कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात अजूनही मोठे कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाले नाहीत. काहींनी अद्याप हंगामही सुरू केला नाही. कोल्हापूर जिल्ह्यात केवळ ८ साखर कारखाने गेल्या आठवड्यात सुरू झाले.

दिवाळीनंतर थोड्या थोड्या प्रमाणात शेतमजूर कारखाना परिसरात दाखल होत आहेत. मात्र माळभाग वगळता अजूनही वाफसा फारसा नसल्याने ऊसतोडीला अपेक्षित गती नाही. बहुतांशी कारखान्यांनी व्यावसायिक भूमिका घेताना कारखाने लवकर सुरू करण्याला प्राधान्य दिले नाही. सुरुवातीच्या टप्प्यात ऊसतोडणीचे आव्हान तर आहेच, पण रिकव्हरी (साखर उतारा) ही अत्यंत कमी लागत असल्याने गाळप तोट्याचे ठरते.

Sugarcane Crushing
Sugarcane Crushing : गेल्या गळीत हंगामात विक्रमाच्या राशी

कारखान्यांनी हंगाम सुरू होण्यापूर्वी ठरलेल्या वेळापत्रकापेक्षा आठ ते दहा दिवस हंगाम पुढे ढकलला. याचाच परिणाम ऊसतोडणीस अद्याप गती न येण्यावर झाला. गेल्या हंगामात ऑक्टोबर अखेरपर्यंत ३७ सहकारी तर तर ४१ खासगी कारखाने असे मिळून ७८ कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. यंदा याच कालावधीत २१ सहकारी व २२ खासगी अशा एकूण ४३ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. रिकव्हरीही केवळ पाच ते सहा टक्के इतकीच आहे.

Sugarcane Crushing
Cotton Rate : कापूस कधीपर्यंत दबावात असेल?

मराठवाडा पिछाडीवर
यंदा मराठवाड्यात ऊस क्षेत्र जादा असल्याने या भागात उसाची तोड लवकर सुरू होईल अशी अपेक्षा होती. पहिल्या पंधरवड्यात मात्र अंदाज चुकला आहे. औरंगाबाद, नांदेड, अमरावती विभागात प्रत्येकी एक कारखाना सुरू झाला आहे. तर नागपूरने अजून खातेही खोललेले नाही. पुणे विभागात सर्वाधिक १४ कारखाने, तर सोलापूर विभागात १३ कारखाने सुरू झाले आहेत.
---

ऊसतोडणीचा दबाव यंदाही कायम?
सरकारने गेल्या हंगामात ऊसतोडणीला विलंब झाल्याने झालेले नुकसान टाळण्यासाठी यंदा कारखाने लवकर सुरू करण्याची घोषणा केली. पण ऐनवेळी आलेल्या पावसाने या नियोजनाला खोडा घातला. ज्या मराठवाड्यात गेल्या वर्षी ऊस उत्पादकांनाही घाम फोडला त्याच मराठवाड्यात यंदा अत्यंत धीमा प्रारंभ झाला आहे. मराठवाड्यातील ५८ पैकी केवळ तीन कारखान्यांनीच हंगामास प्रारंभ केला आहे. सध्या पाऊस थांबल्याने येत्या पंधरवड्यात बहुतांशी कारखाने सुरू होण्याची शक्यता आहे. तोडणी कार्यक्रमात गेल्या वर्षी सारखाच दबाव यंदाही कायम असल्याचे मत कारखाना प्रतिनिधींनी व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com