Farmers Income: आठ वर्षात लाखांवर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट

‘‘देशात २४ कोटी शेतकरी (Farmers) असून यातील ८५ टक्के हे अल्प आणि अत्यल्प शेतकरी आहेत. गेल्या आठ वर्षात कृषी क्षेत्रास चालना देण्यासाठी आणि बळकटी करण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न केले गेले आहेत.
Narendra Singh Tomar
Narendra Singh TomarAgrowon

नवी दिल्ली : गेल्या आठ वर्षांत केंद्र आणि राज्य, शास्त्रज्ञ आणि शेतकरी समाजाने केलेल्या प्रयत्नांमुळे देशातील लाखांवर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाल्याचा दावा केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी केला आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदे(आयसीएआर)च्या ९४व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कृषिमंत्री श्री. तोमर बोलत होते. आयसीएआरने तयार केलेल्या ई-बुकचे प्रकाशनही श्री. तोमर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

या ई-बुकमध्ये गेल्या आठ वर्षांत उत्पन्न दुप्पट झालेल्या शेतकऱ्यांच्या ७५ हजार यशोगाथांची माहिती देण्यात आली आहे. यात विविध राज्यातील फलोत्पादन (Horticulture) आणि हंगामी पिकांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांचे उत्पन्न १२५.४४ टक्के २७१.६९ टक्के इतके उत्पन्न वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. केंद्र सरकारने २०१६मध्ये २०२२पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार केला होता.

कृषिमंत्री तोमर म्हणाले,‘‘देशात २४ कोटी शेतकरी (Farmers) असून यातील ८५ टक्के हे अल्प आणि अत्यल्प शेतकरी आहेत. गेल्या आठ वर्षात कृषी क्षेत्रास चालना देण्यासाठी आणि बळकटी करण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न केले गेले आहेत. लाखो शेतकऱ्यांचे उत्पन्न केवळ दुप्पटच झाले नाही; तर यातील अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीपेक्षाही अधिक झाले आहे.’’

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षानिमित्त जाहीर ‘आझादी का अमृत महोत्सव’चा भाग म्हणून आयसीएआरने गेल्यावर्षी या लाखों शेतकऱ्यांमधील सुमारे ७५ हजार निवडक शेतकऱ्यांच्या यशोगाथांचे संग्रह करण्याचा गेल्यावर्षी निर्धार केला होता, असे श्री. तोमर म्हणाले. तसेच त्यांनी हा उपक्रम यशस्वीरीत्या हाताळल्याबद्दल आयसीएआर आणि कृषी विज्ञान केंद्रांनी कष्ट घेतले, याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

कृषिमंत्री श्री. तोमर म्हणाले,‘‘केंद्र, राज्यांनी केलेले प्रयत्न, शेतकऱ्यांची मेहनत, सरकारची चांगली धोरणे आणि शास्त्रज्ञांचे संशोधन यांचे संकलन या ७५ हजार यशस्वी शेतकऱ्यांच्या या ई-बुकमध्ये नोंदवले गेले आहे. या यशोगाथा इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणादायी ठरले आहे.’’

दरम्यान, आयसीएआरने यात दिलेल्या माहितीनुसार, या ई-बुकमध्ये २०१६-१७ हे प्रारंभ वर्ष आणि २०२०-२१ हे प्रभाव वर्ष ठरवून ७५ हजार यशस्वी शेतकऱ्यांचे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. हंगामी पिके, फलोत्पादन, पशुधन, मत्स्यपालन आणि शेती/बिगरशेती उद्योगांसह ‘कृषी’च्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्पन्नात वाढ दिसून आली.

एकूण उत्पन्नातील वाढ लडाखमध्ये १२५.४४ टक्के, तर अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये २७१.६९ टक्क्यांपर्यंत होती. उत्तराखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि पुद्दुचेरीच्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात २०० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली. इतर बहुतांश राज्यांमध्ये १५०-२०० टक्क्यांच्या श्रेणीत एकूण उत्पन्नात वाढ झाली आहे.

जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, लडाख, झारखंड, सिक्कीम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, गोवा, गुजरात, महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या १४ राज्यांमध्ये एकूण उत्पन्नात फलोत्पादनाचा मोठा वाटा आहे. हिमाचल प्रदेश, केरळ आणि गोवा या पहिल्या तीन राज्यांचा एकूण उत्पन्नात ६० टक्क्यांहून अधिक वाटा आहे.

२०१६-१७ ते २०२०-२१ या दरम्यान शेती पिकांतील एकूण उत्पन्नातील वाटा घसरत असला तरी, पंजाब, उत्तराखंड, हरियाना, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी आणि तेलंगण या ११ राज्यांमध्ये उत्पन्नाचे प्रमुख स्रोत म्हणून हंगामी पिकेच होती. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि हरियाना ही राज्ये या श्रेणीतील पहिल्या तीनमध्ये आहेत.

पशूधन या राज्यात महत्त्वाचे...

आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि नागालँड या राज्यांमध्ये पशुधन हे एकूण उत्पन्नाचे प्रमुख स्रोत राहिले.

फलदायी फलोत्पादन

या कालावधीत अतिरिक्त उत्पन्नाच्या बाबतीत १७ राज्यांमध्ये फळबाग हा प्रमुख घटक होता. यात टक्केवारीनुसार सर्वाधिक उत्पन्न हिमाचल प्रदेश ६७.७२ टक्के, लडाख ६१.११ टक्के, दिल्ली ६०.१५ टक्के, केरळ ५९.१५, कर्नाटक ५८.०६ टक्के, गोवा ५७.३३ टक्के, गुजराथ ५५.८९ टक्के यांचे आहे.

हंगामी पिके येथे मुख्य स्रोत

हंगामी पिके काही राज्यात अधिक उत्पन्नाचे मुख्य स्रोत होती. यात पंजाब ३०.१३ टक्के, उत्तर प्रदेश ३६.९२ टक्के, हरियाना ३९.३५ टक्के, बिहार ४०.३९ टक्के, राजस्थान ४२.०६ टक्के, मध्य प्रदेश ४८.४६ टक्के, आणि छत्तीसगड ४९.०१ टक्के

अहवाल निष्कर्ष

आयसीएआरने आपल्या निष्कर्षात म्हटले आहे, की अंतिमत: देशभरातील सर्व कृषी क्षेत्र आणि जमीनधारकांचे उत्पन्न दुप्पट करणे शक्य असल्याचा हा अहवाल वस्तुस्थिती मांडतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित उत्पन्नातील वाढ ही एक वास्तविकता आहे आणि प्रशासकीय आणि धोरणात्मक समर्थनाच्या आवश्यक पाठिंब्याने देशभरात प्रसार होऊ शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com