
Pune News : राज्यातील बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी विक्री व्यवहारातील शेतकऱ्यांचे पैसे उशिराने देणे, पैसे थकविणे, पैसे न देता पोबारा करणे आदी विविध घटनांमधून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत.
या फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी बाजार समित्यांना आणि आडत्यांना कायद्याची आठवण करून देणारे पत्र पणन संचालक शैलेश कोतमिरे यांनी सर्व बाजार समित्यांना धाडले आहे.
शेतमाल खरेदी विक्रीचे पैसे तातडीने द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा असा दम पणन संचालकांनी बाजार समित्यांना दिला आहे. बाजार समितीमध्ये शेतमालाची विक्री केल्यानंतर अडत्यांनी वजन होताच तातडीने शेतमालाचे पैसे देणे पणन कायद्याने अपेक्षित आहे. मात्र अनेकवेळा शेतीमाल विक्री केल्यानंतर आणि त्याचे वजन झाल्यानंतर अडत्यांकडून शेतकऱ्यांना त्याचदिवशी रक्कम दिली जात नाही.
हे पैसे आडते आणि व्यापारी स्वतः इतर ठिकाणी वापरताना आणि एक आठवडा, महिना किंवा अधिकच्या कालावधीनंतर शेतकऱ्यांना दिली जात असल्याचे सध्याचे वास्तव आहे.
अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या अनेक तक्रारी पणन संचालनालयाकडे झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आणि आर्थिक फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. अशा घटना घडू नयेत यासाठी पणन संचालकांनी पत्र पाठविले आहे.
पत्रात म्हटले आहे की, बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल किंवा त्यांच्या शेतमालाच्या विक्रीएवढी रक्कम मिळत नसल्याचे आढळल्यास त्या संदर्भात बाजार समितीने आपल्या अधिकाऱ्यांमार्फत बाजारातील अडत्यांच्या हिशेबाच्या पुस्तकांची नियतकालिक तपासणी करावी.
त्या संदर्भात चौकशी करण्याचे आदेशही कोतमिरे यांनी काढलेल्या परिपत्रकात दिले आहेत. एखाद्या व्यापाऱ्याने शेतकऱ्याला पैस दिले नसल्याचे आढळल्यास व्यापाऱ्याने बाजार समितीकडे ठेवलेल्या अनामत रकमेतून ते देण्यास किंवा ज्या बँकेने हमी दिली आहे.
त्या बँकेस ते पैसे देण्याविषयीचे आदेश द्यावेत, अशी कायद्यात तरतूद असल्याची आठवण कोतमिरे यांनी बाजार समित्यांना करून दिली आहे.
जिल्हा उपनिबंधकांनी सातत्याने भेटी द्याव्यात
बाजार समितीनेही बाजाराच्या आवारात शेतमालाचे लिलाव झाल्यानंतर त्याचदिवशी आवारातील सर्व व्यापारी, अडत्याकडे जाऊन किती शेतमालाची खरेदी झाली, त्याची विक्री किमत काय तसेच शेतमालाची शेतकऱ्यांना किती किंमत अदा केली, याची माहिती घेणे आवश्यक आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.
नियमांचे पालन न करणाऱ्या बाजार समितीतील अडत्यावर वेळीच कारवाई करा, असे आदेश त्यांनी दिले आहेत. त्या संदर्भात सहकारी संस्थांच्या जिल्हा निबंधक तसेच सहायक निबंधकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील बाजार समित्यांमध्ये वारंवार भेटी द्याव्यात. परिपत्रकाचे पालन होते की नाही, याची खातरजमा करावी, अशाही सूचना त्यांनी दिल्या आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.