
मुकुंद पिंगळे : ॲग्रोवन वृत्तसेवा
Crop Damage Update : नाशिक : ‘‘उन्हाचा चटका असताना दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. गारा आणि चक्री वादळासारख्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे निसर्गाचा तांडव सुरू झाला.
ऐन कडक उन्हाळ्यात पावसाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली, काही क्षणांत शिवारात गारांचा खच साचून शिवारात पांढरा शुभ्र थर साचला होता. तर शिवारात पाणीच पाणी साचून शेतीचे बांध फुटून पाणी वाहिले.
मागील महिन्यात अस्मानीचा फटका होताच. त्यात शेतीमालाला भाव नसल्याने आर्थिक घडी विस्कटली आहे. खरीप तोंडावर आहे, पण हातात पैसा नाही. आम्ही किती सोसायचं, आता अख्ख आभाळ आमच्यावर कोसळलं,’’ अशी विवंचना शेतकऱ्यांनी मांडली आहे.
मंगळवारी (ता. २३) झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीमुळे सटाणा तालुक्यातील जुनी शेमळी, नवी शेमळी व आराई या गावांना अस्मानी संकटाचा मोठा तडाखा बसला.
कर्जाच्या खाईत लोटलेला शेतकरी आता पुन्हा अस्मानीच्या संकटामुळे हतबल झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे या गावामध्ये विजेचे खांब पडल्याने गेल्या चार दिवसांपासून वीजपुरवठा खंडित आहे.
त्यामुळे कृषिपंप चालत नसल्याने घरगुती वापर व जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीतून पाणी ओढून डोक्यावर वाहून आणताना मोठी वणवण शेतकऱ्यांना करावी लागत आहे.
परिसरात फेरफटका मारताना शेकडो झाडे वादळामुळे उन्मळून पडलेली दिसतात. विजेचे खांब आडवे झाल्याने तारा जमिनीवर लोळत आहेत. घरावरील पत्रे उडाल्याने फक्त भिंतीच उभ्या दिसत आहेत.
तर कांदा चाळीवरील पत्रे व आच्छादन उडून गेल्याने हजारो क्विंटल कांदा भिजून खराब झाला आहे. अनेक ठिकाणी डाळिंब बागा आडव्या झाल्या आहेत. अचानक आलेल्या पावसात साठवून ठेवलेला चारा भिजून खराब झाला.
तर काही चारा वादळामुळे उडून गेला. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न या भागात गंभीर झाला आहे.
शेतकऱ्यांचा लोकप्रतिनिधींवर संताप
बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी या भागातील नुकसानीची पाहणी करत तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी शासनास प्रस्ताव सादर करा, तसेच मदत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
मात्र त्यानंतर गरजूंना मदत आलीच नाही, शिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. घरावरील पत्रे उडाल्याने अनेकांचे प्रपंच उघड्यावर आले आहेत.
त्यांना मदत करणे दूरच; मात्र आमदार रस्त्यावरून पाहून गेले, आमच्यापर्यंत आले नाहीत, असे सांगत शेतकरी संताप व्यक्त करत होते.
‘कसं जगावं हे आता सरकारने सांगाव’
डाळिंबाचा आंबिया बहर धरला होता. झाडांवर चांगली फळे तयार झाली होती. मात्र वादळ व गारपिटीने दीड एकरावरील डाळिंब बाग उद्ध्वस्त झाली आहे. फळांना गारांचा मार लागल्याने फळे तुटून पडली आहेत.
हे वर्ष पूर्णपणे वाया गेले आहे. यापूर्वी मुदत संपली असे कारण सांगून यापूर्वी पंचनामा झाला नव्हता. आता नुकसान पाहण्यासाठी कृषी सहायकांना बोलावले.
मात्र पंचनामे करण्यास आदेश नसल्याचे सांगत आहेत. शेतकऱ्याने जगावं कस हे आता सरकारने सांगाव, असे नुकसानग्रस्त नवी शेमळी येथील शेतकरी संदीप वाघ यांनी सांगितले.
नुकसानीची भयावह स्थिती
- ३०० ते ४०० झाडे उन्मळून पडले.
- वाऱ्यामुळे जवळपास १०० हून अधिक विजेचे खांब जमीनदोस्त; शिवारात ४ दिवसापासून वीजपुरवठा खंडित
- ७० ते ८० कांदा चाळींचे नुकसान; हजारो क्विंटल कांदा भिजला.
- ५० हून अधिक जनावरांच्या गोठ्यांची हानी,पशुधन मृत
- जवळपास ६० घरांवरील पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर
‘भूतो न भविष्यती’ अशा संकटाने शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे कांदा चाळीवरील आच्छादन उडून गेल्याने २५० क्विंटल कांदा पावसात भिजला.
विजेचे खांब पडून गेल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसऱ्यांच्या विहिरीवर जाऊन पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. ६ ते ७ लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे.
- देवेंद्र खैरनार, नुकसानग्रस्त शेतकरी, जुनी शेमळी
वारा इतका सोसाट्याचा होता की,गोठ्यावरील सर्व पत्रे उडून २ गायी, म्हशी आणि वासरे दाबले गेले होते. मजुरांसाठी बांधलेल्या खोल्यांवर पत्रे उडाले. लेकुरवाळी महिला आणि चार महिन्याचं लेकरू या भीषण संकटात सापडले होते.
मात्र सुदैवाने त्यांना कुठलीही इजा झाला नाही. मात्र पत्रे दूरवर कागदासारखे उडून गेले. बांधकामात गाडलेले लोखंडी खांब सुद्धा उखडले गेले.
- तेजस केदा वाघ, नुकसानग्रस्त शेतकरी, जुनी शेमळी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.