Kolhapur News : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असल्याने सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. धरणक्षेत्र वगळता अन्य भागामध्ये गुरुवारी (ता. २०) पावसाचे प्रमाण कमी राहिले. नद्यांच्या पाण्यात वाढ होत असल्याने ५३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गुरुवारी सकाळी आठपर्यंत संपलेल्या २४ तासांत गगनबावड्यात सर्वाधिक १०४ मिमी पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल शाहूवाडीत ६२ मिमि पावसाची नोंद झाली.
राधानगरी तालुक्यात नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, आपत्कालीन व्यवस्था तैनात केली आहे. भूस्खलनाच्या छायेखाली असलेल्या सात गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे, तर नदी काठावरील पूरबाधित २२ गावांनाही सूचना केल्या आहेत. सलग तिसऱ्या दिवशी गगनबावडा तालुक्यास मुसळधार पावसाने झोडपले.
लखमापूर येथील कुंभी धरणक्षेत्रात उच्चांकी १८१ मिमी पावसाची नोंद झाली. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात चोवीस तासांत ६७ मिमी पावसाची नोंद वारणावती प्रजन्यमापक यंत्रावर झाली. एकूण पाऊस ४८८ मिमी झाला. पाणलोट क्षेत्रातून धरण जलाशयात १३८३१ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरण ५० टक्के भरले आहे.
वारणा नदीवरील रेठरे-कोकरुड बंधारा पाण्याखाली गेला. कोकरुड-तुरुकवाडी दरम्यान शाहिरवाडी येथे राज्य मार्गावर आंब्याचे झाड कोसळल्याने कऱ्हाड-रत्नागिरी मार्ग दोन तास ठप्प होता.
शित्तूरवारुण, कांडवण धरण परिसरात गेल्या ४८ तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. जांबरे (ता. चंदगड) मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. फाटकवाडीच्या पाठोपाठ हा दुसरा मध्यम प्रकल्प भरल्यामुळे घटप्रभेपाठोपाठ ताम्रपर्णी खोऱ्यातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. कागलमधील बंधारे पाण्याखाली गेले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.