
Nashik News : नार-पारचे पाणी दुष्काळग्रस्त मालेगाव व परिसराचे आहे. त्यासाठी आम्ही गेली अनेक वर्षे भांडतो आहोत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे पाणी पळवण्याच्या विचारात आहेत. यासाठी ते उपमुख्यमंत्री झालेत का? असा काही विचार असल्यास तीव्र संघर्ष करू, असा इशारा मालेगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिला आहे.
बीड येथील कार्यक्रमात अजित पवार यांनी एक लाख कोटी रुपये खर्च झाला तरी चालेल नार-पारचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणून मराठवाड्यात पाणी पोहोचवू असे वक्तव्य केले. त्यावर मालेगावच्या शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त करत जोरदार निषेध केला. नार-पारचे पाणी पुन्हा पळविण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही, असा इशारा देतानाच कसमादेना परिसरातील आमदार, खासदार या संदर्भात मूग गिळून बसल्याने त्यांना बांगड्यांचा आहेर देण्याचा इशारा देण्यात आला.
शिवसेनेचे (उबाठा) प्रमोद शुक्ला, राजाराम जाधव, किशोर जाधव आदी पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदारांना मागणीचे व उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याच्या निषेधाचे निवेदन दिले. कसमादेकरांच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार कदापि खपवून घेतला जाणार नाही. असे वक्तव्य करणाऱ्यांना आगामी निवडणुकीत उत्तर देऊ, असे सांगत शिवसेनेने अजित पवार यांचा जोरदार निषेध केला.
याबाबत निवेदनात म्हटले आहे, की नार-पार प्रकल्पासाठी माजी मंत्री प्रशांत हिरे यांनी पुढाकार व पाणी परिषदा घेतल्या. उत्तर महाराष्ट्राचे पाण्याविषयी दुष्टचक्र थांबविण्यासाठी व शेती सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी हा एकमेव पर्याय आहे. नार-पारचे पाणी नैसर्गिकरीत्या उत्तर महाराष्ट्रात येऊ शकते. मराठवाडादेखील आपल्या राज्याचा भाग आहे. मात्र नार-पारच्या पाण्यावर पहिला अधिकार गिरणा खोऱ्याचा असल्याने या खोऱ्याचा प्राधान्याने विचार व्हायला हवा.
उत्तर महाराष्ट्रातील बळीराजाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. अजित पवार यांनी अर्थमंत्री असताना २००६ मध्ये गोदावरी खोऱ्यासाठी मांजरपाडा-१ व तापी गिरणा खोऱ्यासाठी मांजरपाडा-२ हे प्रकल्प मंजूर केले. दोन्ही प्रकल्प एकाचवेळी पूर्ण करण्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात मांजरपाडा-२ चे कुठलेही काम झालेले नाही. त्यामुळे आता गिरणा खोऱ्याच्या हक्काच्या पाण्यासाठी लढा देण्याची वेळ आली आहे.
निवेदनावर नाना देवरे, सुधाकर जोशी, नंदलाल शिरोळे, लक्ष्मण शेलार, कैलास पाटील, रमेश देसले, ज्ञानेश्वर कापडणीस, राजेंद्र सूर्यवंशी, जालिंदर शेलार, राजू निकम, योगेश निकम, विवेक सावळे, जितेंद्र ठाकूर, मनोहर जाधव, नथू देसले, विष्णू पवार, शंकर पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.