Atal Bhujal Yojana : अतिशोषित’मधून ‘सुरक्षित’ श्रेणीत येण्याचा निर्धार

अटल भूजल योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरीय क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमास १३ जिल्ह्यांत सुरुवात
Atal Bhujal Scheme
Atal Bhujal SchemeAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : भूजल पातळी खालावण्याचा वेग गंभीर स्थितीत पोचलेली, वार्षिक उपलब्धतेच्या तुलनेत वार्षिक भूजल उपसा अधिक होणाऱ्या गावांमध्ये केंद्र शासनाच्या अटल भूजल योजनेअंतर्गत (Atal Bhujal Yojana) ग्रामपंचायत स्तरीय (Grampanchyat Level) क्षमता बांधणी कार्यक्रमास १३ जिल्ह्यांमध्ये सुरुवात झाली आहे.

Atal Bhujal Scheme
Atal Bhujal Scheme : दीड लाख नागरिकांमध्ये होणार ‘अटल भूजल’ची जनजागृती

२६ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमांमध्ये ‘अतिशोषित पाणलोट’ क्षेत्र श्रेणी गटामधून ‘सुरक्षित पाणलोट’ क्षेत्र श्रेणीमध्ये येण्यासाठी सारे गाव एकत्र आणून उपाययोजना करण्याचा निर्धार गावागावांत आयोजित पहिल्या पहिल्या प्रशिक्षणांमधून व्यक्त होत आहे. अटल भूजल योजनेअंतर्गत, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (जीएसडीए)- महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली सिमासेस लर्निंग (एसआयआयएलसी) या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून या प्रशिक्षण उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे.

Atal Bhujal Scheme
Abhay Yojana : ‘अभय’च्या लाभासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत

गावचे ग्रामपंचायत मंडळ, प्रमुख नेते मंडळी, शेतकरी गटांचे प्रतिनिधी, पाणीवापर संस्थांचे प्रतिनिधी, विहीरमालक, कूपनलिका मालक शेतकरी, महिला गटांचे सदस्य अशा ग्रामपंचायत स्तरीय घटकांची गावातील जलसुरक्षा आराखडा राबवणे तसेच वार्षिक जलअंदाज पत्रक बनवण्याबाबत क्षमता बांधणी करण्याचा उद्देश या प्रशिक्षणांमागे आहे. २०२२-२३ या वर्षामध्ये राज्यातील १३ जिल्ह्यांतील ४३ तालुक्यांतील ११३३ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर ६ प्रशिक्षणे होणार आहेत.

Atal Bhujal Scheme
Salokha Yojana : शेतजमिनींच्या ताब्यासाठी ‘सलोखा योजना’


प्रशिक्षणातील विषय
- अटल भूजल योजनेतील पंचसूत्रीची अंमलबजावणी
- गावच्या जलसुरक्षा आराखड्याची अंमलबजावणी
- गावचे वार्षिक जल अंदाजपत्रक (पाण्याचा ताळेबंद) मांडण्याची प्रक्रिया
- जलसुरक्षा आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी शासकीय योजनांचे समन्वयन (कॉन्व्हर्जन्स)
- शेतामध्ये तसेच घरगुती पातळ्यावर पाणी बचतीच्या उपाययोजना, सूक्ष्म सिंचनाचा अवलंब
- लोकसहभागीय पद्धतीने गावच्या भूजल संपदेचे शाश्वत व्यवस्थापन
- जल संवर्धन, व्यवस्थापनासाठी गाव स्तरावर व्यापक संवाद धोरण राबवणे
- जल व्यवस्थापनामध्ये शेतकरी कंपनी, पाणी वापर संस्थेची भूमिका


भूजल चळवळीसाठी नेत्यांना आवाहन
गावातील पाणीटंचाईची समस्या दूर व्हावी, सर्वसमावेशक व शाश्वत विकासाची संकल्पनेचा अवलंब व्हावा, गाव पाणीदार बनावे यासाठी गावस्तरावरील ग्रामपंचायत मंडळ, प्रमुख नेतेमंडळी, प्रमुख शेतकरी यांनी पुढाकार आवश्यक आहे. शाश्वत भूजल व्यवस्थापनाची लोकचळवळ उभी करण्यासाठी गावच्या नेतेमंडळींनी पुढाकार घेण्याचा विचार या प्रशिक्षणांमधून मांडला जात आहे.


महिलांचा सहभाग, पुढाकार हवा
कोणत्याही गोष्टीचे चोख नियोजन करणे, व्यवस्थापन करणे या बाबी महिलांना चांगल्या जमतात. त्यामुळे जीवनाशी आवश्यक निसर्गघटक असलेल्या पाण्याचे आणि एकूणच सगळ्या गावचा आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक गाडा अवलंबून असणाऱ्या भूजलस्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनामध्ये गावातील महिलावर्गाने, महिलांच्या गटाने पुढाकार घेऊन अटल भूजल योजनेच्या माध्यमातून आपले गाव पाणीदार करण्याची गरज आहे.

प्रतिक्रिया (कोट) (आपल्या एडीशनशी संबंधित कोट वापरता येतील)
पहिल्या प्रशिक्षणामधून भूजल व्यवस्थापनाबाबत चांगली माहिती मिळाली. गावातील भूजल पातळी उंचावण्याबाबत प्रभावी उपाययोजनांसाठी ग्रामसभा घेऊन लोकसहभाग वाढवण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येतील.
- तेजस्विनी मोरे, सरपंच, आढीव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर

पहिल्या प्रशिक्षणातून गाव पाणीदार करण्यासाठी प्रेरणा मिळाली. महिलांच्या पुढाकारातून योजनेची प्रभावी अंमलबजावणी गावात केली जाईल.
- शुभांगी तनपुरे, सरपंच, वडगाव तनपुरा, ता. कर्जत, जि. अहमदनगर

पाणी नियोजनामध्ये जनावरांचा कधी विचारच होत नाही. गाय, म्हैस, कुत्रे, मांजर, कोंबडी, शेळी अशा पाळीव पशुपक्षांसाठी रोज किती पाणी लागते याची आकडेवारी मला पहिल्यांदाच या प्रशिक्षणाच्या माध्यमातून समजली. एकूणच प्रशिक्षण खूप माहितीपूर्ण ठरले.
- जयश्री सोनवणे, आशा स्वयंसेविका, पाणवद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com