
Chhatrapati Sambhajinagar News : ‘‘राज्यातील तळागाळातील गोरगरीब माणसांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार,’’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
स्थानिक अयोध्यानगरी मैदानावर महाआरोग्य शिबिराचे आयोजन रविवारी (ता. १३) करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटक म्हणून उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
या उद्घाटन समारंभास ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आमदार हरिभाऊ राठोड, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रशांत बंब, आमदार नारायण कुचे आदी उपस्थित होते.
तसेच विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपमुख्यकार्यकारी अधिकारी भोकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा तसेच मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक येथून खास महाशिबिरासाठी आलेले नामांकित डॉक्टर्स उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘महाआरोग्य आरोग्य शिबिर सामान्य माणसाला असाध्य आजारावरील तपासणी, उपचार मोफत करण्यासाठी आयोजित केले आहे. या शिबिरात साडेतीन लाख नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी झाली. देशात अडीच लाख ‘वेलनेस सेंटर’च्या माध्यमातून गरीब लोकांवर उपचार करण्यात येणार आहेत. पंतप्रधान आरोग्य कल्याण निधीतून वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळते.
वयोश्री योजनेतून वयोवृद्धांना उपचार व साहित्य मोफत दिले जाणार आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून ५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत होणार आहेत. आरोग्य सेवेचा अधिक विस्तार करण्यासाठी शासनाने राज्यात १४ वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला.
त्यातील ११ वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली आहेत. उर्वरित तीन लवकरच सुरू होतील.’’ प्रास्ताविक राजेंद्र साबळे यांनी केले. रामेश्वर नाईक यांनीही या आयोजनाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. शिरीष बोराळकर यांनी आभार प्रदर्शन केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.