Foxtail Millet Crop : आपत्कालीन परिस्थितीत खरिपात राळ्याचे पीक ठरू शकते फायदेशीर

Rala Crop : पौष्टिक मूल्यांमुळे सद्यःस्थितीत राळा पिकाचे महत्त्व कायम
Foxtail Millet Crop : आपत्कालीन परिस्थितीत खरिपात राळ्याचे पीक ठरू शकते फायदेशीर
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Kharif Rala millet : अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या बुलडाणा येथील संशोधन केंद्रावर राज्यात पहिल्यांदा राळ्याचा वाण विकसित झाला आहे. खरीप, रब्बी, तसेच उन्हाळी अशा तीनही हंगामांत हे पीक घेता येणार आहे. यंदाच्या ‘जॉइंट अॅग्रेस्को’मध्ये प्रसारित झाला आहे.

राळ्याचा हा वाण (Foxtail Millet Variety) सध्याच्या इतर वाणांच्या तुलनेत लवकर येणारा आहे. कृषी क्षेत्रात आजवर लघू तृणधान्य पिकांत प्रामुख्याने राळा, वरई, बर्टी, नाचणी, कोडो, बाजरी दुर्लक्षित झाले आहेत. वास्तविक या पिकांतील पौष्टिक मूल्यांचा विचार करता सध्याच्या परिस्थितीत उत्तम आरोग्य व आहारविषयक जनजागृतीमुळे या पिकांचे महत्त्व कायम आहे.

युनोने यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष जाहीर केले आहे. याच वर्षात राज्यात राळा पिकाचे पहिले वाण विकसित झाले आहे. बुलडाणा कृषी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर २०१८ पासून प्रयोग सुरू होता. हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला.

राळा पिकास भादली, जर्मन मिलेट असेही म्हटले जाते. या पिकाचे कणीस झुपकेदार असून, पक्वतेच्या वेळेस कोल्ह्याच्या शेपटी सारखे अर्धगोलाकार होते. म्हणून याला फॉक्सटेल (कोल्ह्याची शेपटी) मिलेट असेही इंग्रजीमध्ये म्हणतात. सध्या देशात असलेल्या वाणपरत्वे या पिकाचा कालावधी ७० ते १३० दिवसांचा आहे.

Foxtail Millet Crop : आपत्कालीन परिस्थितीत खरिपात राळ्याचे पीक ठरू शकते फायदेशीर
Climate Change : नियंत्रित शेती ठरू शकते प्रभावी उत्तर

अनेक वर्षांपूर्वी आहारामध्ये मुख्य अन्न म्हणून या पिकाचा समावेश होता. जगातील एकूण पौष्टिक तृणधान्य उत्पादनामध्ये राळा पीक दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुष्काळी परिस्थितीतही हे पीक स्वत:ला वाचवू शकते. मॉन्सूनचे आगमन उशिरा झाल्यास आकस्मित पीक नियोजनात या पिकाला भरपूर वाव असल्याचे सांगितले जाते.

आपल्या आहारातील गहू, भातासोबतच राळ्याचा सुद्धा यात समावेश करणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. राळ्याच्या सेवनाने रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. पोटाचे विकार असणारे आणि मधुमेहींसाठी राळा हे वरदान मानले जाते. राळा हे पचनासाठी सर्वोत्तम असून, कुठल्याही ॲलर्जीपासून मुक्त आहे. ग्लुटेन फ्री असल्यामुळे ग्लुटेन अलर्जी असलेल्या लोकांसाठी एक पर्यायी धान्य आहे.

..असे आहे सुधारित लागवड तंत्रज्ञान
राळा पीक ५०० ते ७५० मिलिमीटरपर्यंत पावसाच्या क्षेत्रात येऊ शकते. विविध प्रकारच्या जमिनीमध्ये तग धरून राहण्याची क्षमता आहे. खरीप हंगामामध्ये जुलैमध्ये तिसऱ्या आठवड्यापर्यंत राळा पिकाची पेरणी केली जाते.

हेक्टरी ५ ते ७ किलो या प्रमाणात बियाणे पेरण्याची शिफारस आहे. राळा पिकाचा राज्यातील पहिला वाण पीडीकेव्ही यशश्री डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत नुकताच प्रसारित करण्यात आला आहे. या पिकापासून हेक्टरी १५ ते १८ क्विंटल उत्पादन मिळते. तसेच कडब्याचे २० ते ४० क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन आहे.

पीडीकेव्ही यशश्रीचे गुणधर्म
पीडीकेव्ही यशश्री या राळा वाणाची धान्य उत्पादन क्षमता हेक्टरी २३.३४ क्विंटल असून, राष्ट्रीय तुल्य वाण लेपाक्षीपेक्षा (१४.७१ क्विंटल हेक्टरी) ५३.५०%, पी.एस. ४ पेक्षा (१५.२४ क्विंटल हेक्टरी) ५३.१५ टक्के आणि डीएचएफटी-१०९-३ पेक्षा (२०.०६ क्विंटल हेक्टरी) २०.८७ टक्के जास्त आहे.

या वाणाचे दाणे मध्यम टपोरे असून, रंग आकर्षक फिक्कट पिवळसर आहे. हा वाण ८१ -८५ दिवसांत पक्व होतो. या वाणाचे कणीस घट्ट असून, त्यावर फुलोरा काळात केस असतात. हा वाण करपा आणि तांबेरा रोगास सहनशील आहे.
(संपर्क ः डॉ. दिनेश कानवडे, पैदासकार, पंदेकृवि संशोधन केंद्र, बुलडाणा, मो. ८८३०६३६८७८)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com