Fertilizer Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती उतरल्या

आंतरराष्ट्रीय बाजारात रासायनिक खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात उतरल्यानंतरही भारतीय कंपन्यांनी शेतकऱ्यांना जादा किमतीत खते विकण्याचा सपाटा बंद केलेला नाही.
Fertilizer
Fertilizer Agrowon

Pune News : आंतरराष्ट्रीय बाजारात रासायनिक खतांच्या किमती (Fertilizer Rate) मोठ्या प्रमाणात उतरल्यानंतरही भारतीय कंपन्यांनी शेतकऱ्यांना जादा किमतीत खते विकण्याचा सपाटा बंद केलेला नाही.

विशेष म्हणजे याबाबत एकाही राज्याने केंद्राकडे तक्रार केलेली नाही. केंद्रदेखील शांत बसल्याने शेतकऱ्यांची लूट होते आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया निविष्ठा उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.

खत उद्योगाच्या म्हणण्यानुसार, रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतात रासायनिक खतांच्या कच्च्या मालाची अभूतपूर्व टंचाई तयार झाली होती. तसेच, जागतिक बाजारात खतांचा पुरवठा घटल्यामुळे किमती अफाट प्रमाणात वाढल्या.

परंतु, डिसेंबरपासून या किमती कमीदेखील होत गेल्या. सध्या तर किमतीत निम्म्याने घसरण झाली आहे. तरीदेखील शेतकऱ्यांना कमी किमतीत खते मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

मात्र, त्याला जबाबदार खत उत्पादक कंपन्या नाहीत. कंपन्यांनी जुन्या दराने करार केलेले आहेत. त्यामुळे कमी झालेल्या दरांचा सरसकट फायदा कंपन्यांना मिळालेला नाही. तसेच, याबाबत केंद्रानेदेखील काहीही निर्देश दिलेले नाहीत.

Fertilizer
Fertilizer Stock Maharashtra : राज्यात गरजेपेक्षा जास्त खते उपलब्ध

कृषी आयुक्तालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, डीएपीसह युरिया व पालाशच्या किमती जागतिक बाजारात कमी झालेल्या आहेत.

परंतु, त्याचा लाभ शेतकऱ्यांना लगेच मिळणे अशी अपेक्षा ठेवता येणार नाही. कारण, देशात दैनंदिन विकल्या जाणाऱ्या रासायनिक खतांच्या किमती जागतिक बाजाराशी जोडलेल्या नाहीत.

खत निर्मितीसाठी केंद्र शासन मोठ्या प्रमाणात अनुदान देते व किमतीदेखील नियंत्रित करते. त्यामुळे केंद्राने घेतलेल्या निर्णयानुसारच भारतीय बाजारात खताच्या किमती कमी जास्त होतात.

राज्यातील शेतकरी ५५ ते ६२ लाख टन खताची खरेदी दरवर्षी करतात. त्यात रब्बीमध्ये २७ लाख टन तर खरिपात जवळपास ३५ लाख टन खतांची खरेदी होते.

२०२१ मधील खरिपात शेतकऱ्यांनी १५.५० लाख टन युरिया तर ५.७० लाख टन डीएपी वापरले होते. ‘एमओपी’च्या किमती जागतिक बाजारात ५९० डॉलरवरून ४२२ डॉलरपर्यंत खाली आल्या आहेत.

डीएपी खत फॉस्फरिक अॅसिडपासून तयार करतात. मुळात, फॉस्फरिक अॅसिडच्या किमती १४७५ डॉलरवरून १०५० डॉलरपर्यंत खाली आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनादेखील कमी किमतीत डीएपी मिळायला हवा, अशी अपेक्षा खत विक्रेत्यांच्या आहेत, असे एका खत कंपनीच्या व्यवस्थापकाने सांगितले.

Fertilizer
Fertilizer Supply : मे महिन्याअखेर सर्व खतांचा पुरवठा करा

जागतिक बाजारात डीएपीच्या दरात सतत घसरण चालू आहे. दीड वर्षापूर्वी १००० डॉलरपर्यंत गेलेली डीएपीची किंमत फेब्रुवारीत प्रतिटन ६४० डॉलर होती. ती आता घसरून ५५३ डॉलरवर आली आहे.

९०० डॉलरवर गेलेली युरियाची किंमत ३१५ ते ३२५ डॉलरवर आली आहे. अमोनियापासून युरिया तयार होतो. खत कंपन्यांना १२०० रुपये प्रति डॉलरने मिळणारा अमोनिया आता ३७५ डॉलरने मिळतो आहे. मात्र, संयुक्त खतांच्या किमती कमी केलेल्या नाहीत.

खतांच्या जागतिक बाजार स्थिती

- डीएपीची किंमत प्रतिटन ९० डॉलरने उतरली

- युरियाची किंमत प्रतिटन ५२५ डॉलरने घटली

- ‘एमओपी’ची किंमत प्रतिटन १७० डॉलरने घसरली

मुळात जागतिक बाजारात गेल्या ८-१० वर्षांपासून डीएपीचे दर ३५०-४०० डॉलर प्रतिटन होते. केवळ रशिया-युक्रेन युद्धामुळे दरवाढ झाली. आता हे दर पूर्वपदावर आले आहेत. मात्र, दरवाढ होताच केंद्राने ८० हजार कोटींचे अनुदान वाढवून थेट दोन लाख कोटींच्या पुढे नेले. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला नव्हता. जागतिक बाजारात दर कमी झाल्यामुळे त्याचा लाभ केंद्राला मिळेल. अनुदान खर्चाचा बोजा कमी होईल.
- मनमोहन कलंत्री, अध्यक्ष, अॅग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन ऑफ इंडिया.
जागतिक बाजारात रासायनिक खतांच्या कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना संयुक्त खते प्रतिगोणी १०० ते १५० रुपयांनी कमी दरात मिळतील. जुना साठा मात्र पूर्वीच्याच दराने विकला जाईल.
- विजय पाटील, खत उद्योगातील तज्ज्ञ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com